कुष्ठ रुग्णांना अखेर मिळाले मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:33+5:302021-05-19T04:41:33+5:30
कल्याण : केडीएमसी हद्दीतील कुष्ठ रुग्णांना मनपाकडून दरमहिना मिळणारे अडीच हजार रुपयांचे मानधन नऊ महिने मिळालेले नव्हते. आधीच कोरोनामुळे ...
कल्याण : केडीएमसी हद्दीतील कुष्ठ रुग्णांना मनपाकडून दरमहिना मिळणारे अडीच हजार रुपयांचे मानधन नऊ महिने मिळालेले नव्हते. आधीच कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असताना मानधनाअभावी कुष्ठ रुग्णांची परवड होत होती. याबाबत ४ मे रोजीच्या ‘लोकमत’मध्ये ‘कोरोनाकाळात होतेय कुष्ठ रुग्णांची परवड’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. त्या वृत्ताची दखल घेत कुष्ठ रुग्णांचे नऊ महिन्यांचे थकीत मानधन त्यांच्या बँक खात्यात मनपा प्रशासनाने जमा केले आहे.
कल्याण पूर्वेतील पत्री पुलानजीकच्या हनुमाननगरमध्ये कुष्ठ रुग्णांची १६० कुटुंबे वास्तव्याला आहेत. यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर सध्या येथील १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांना दररोज मलमपट्टी करावी लागते. यातील ६७ रुग्णांना केडीएमसीकडून दरमहिना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. उपजीविकेचा कोणताच मार्ग उपलब्ध नसताना मनपाकडून मिळणारे मानधन कुष्ठ रुग्णांसाठी मोठा आधार ठरले आहे. मात्र, नऊ महिने लाभार्थी असलेले कुष्ठ रुग्ण मानधनापासून वंचित होते. त्यामुळे कोरोनाकाळात त्यांची परवड झाली होती.
शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी कुष्ठ रुग्णांना लवकरात लवकर मानधन मिळावे, याकडे मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि वैद्यकीय आरोग्य विभागाचे लक्ष वेधले होते. हनुमाननगर कुष्ठ सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड हे देखील वारंवार वैद्यकीय आरोग्य विभागात जाऊन मानधनाबाबत चौकशी करीत होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने जुलै २०२० ते मार्च २०२१ पर्यंतचे नऊ महिन्यांचे थकीत वेतन लाभार्थी कुष्ठ रुग्णांच्या बँक खात्यात जमा केले आहे, अशी माहिती कुष्ठ मित्र गजानन माने यांनी दिली, तर गायकवाड यांनी समस्येला वाचा फोडून न्याय दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
----------------------