अंगारकी असूनही टिटवाळा गणपती मंदिरात तुरळक गर्दी; पूजा साहित्य विक्रेते चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 04:58 PM2019-09-17T16:58:30+5:302019-09-17T17:00:54+5:30
फारशी विक्री न झाल्याने विक्रेते
- उमेश जाधव
टिटवाळा:अंगारकी चतुर्थी निमित्त टिटवाळा येथील महागणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मंगळवारी तुरळक गर्दी दिसून आली. सोमवारी रात्री 12 वाजता गणपती देवाला दुग्ध अभिषेक करून आरती नंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने मंदिरात विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर येईल अशी मंदिरातील पुजारी व येथील पूजा साहित्य विक्रत्यांची भावना होती. मात्र आज मंदिरात अतिशय कमी गर्दी पाहायला मिळाली.
सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून मंदिर विश्वस्तांनी अंगारकी चतुर्थी म्हणून देवाच्या पुजेची तयारी सुरू केली होती. रात्री 12 वाजता देवाला अभिषेक केल्यावर आरतीनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया.. उंदीर मामा की जय.. या घोषणांनी मंदिर, मंदिर परिसर व सभामंडप दणाणून गेले होते. रात्री पासूनच मंदिर सभामंडपातील दर्शन बारीत भाविकांनी काही प्रमाणात गर्दी केली होती. तसेच सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर काही प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली. मात्र नेहमीप्रमाणे आवारातील व तलावा सभोवतालची दर्शन बारी पूर्णपणे भाविकांनी भरली नाही. रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने आणि त्यात रेल्वेची लोकल सेवाही उशिराने धावत असल्याने भाविकांची गर्दी कमी असल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले.
दुपारी 12 नंतर तुरळक प्रमाणात का होईना गर्दीत वाढ झाली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या उपनगरांसह मुंबई व ठाणे या शहरातील भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अंगारकी चतुर्थी असल्या कारणाने येथील पूजा साहित्य विक्रेत्यांनी हार, फुले, मोदक, नारळ व इतर पुजेचे साहित्य जास्त प्रमाणात मागवले आहे. मात्र फारशी विक्री न झाल्याने बरेचसे साहित्य पडून आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसरात 40 कर्मचारी व 8 अधिकारी असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर सुरक्षा रक्षक, अनिरुद्ध बापू साधक व काही सामाजिक संस्थांचे साधकदेखील याठिकाणी आपले कर्तव्य बजावताना दिसत होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन दलाची व आरोग्य खात्याची यंत्रणादेखील मंदिर प्रांगणात सज्ज होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी भाविकांची गर्दी वाढली तर वाढेल अशा प्रकारचे मत मंदिर विश्वस्त योगेश जोशी यांनी लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
नेहमीच्या अंगारकी चतुर्थीला ज्या प्रमाणे गर्दी असते त्याच्या पंचवीस टक्केदेखील गर्दी आज नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात पूजा साहित्य आणले आहे ते अंगावर पडणार असून आम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.
गणेश दलाल, पुजा साहित्य विक्रेता.