भाज्यांनी ओलांडली शंभरी; कोथिंबीर, मटार, फ्लॉवर, कारले, फरसबी, सिमला मिरचीने खाल्ला भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 01:43 AM2020-10-08T01:43:47+5:302020-10-08T01:44:00+5:30
कांद्यापाठोपाठ फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. एकीकडे कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, दुसरीकडे भाज्यांनी तोंडचे पाणी पळवले आहे.
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कडाडले आहेत. भाज्यांनी शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले आहेत. प्रत्येक भाजीमागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कांद्यापाठोपाठ फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. एकीकडे कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, दुसरीकडे भाज्यांनी तोंडचे पाणी पळवले आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असताना भाज्यांच्या वाढत्या दरांमुळे घरांचे बजेटही कोलमडत चालले आहे. पालेभाज्यांचे दरही वाढले असल्याने मोठ्या जुड्यांच्या छोट्या जुड्या करून विकल्या जात आहेत.
जनसामान्यांवर कोसळले दुहेरी संकट
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या नोकºया गेल्या. काहींचे पगार कमी झाले, तर काहींना सक्तीच्या बिनपगारी दीर्घ रजा दिल्या आहेत. दुसरीकडे उद्योगधंदेही ठप्प झाल्याने हातमजुरी करणाºया गोरगरिबांसह किरकोळ व्यावसायिकांवरही मोठे संकट कोसळले आहे. अशातच भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने जनसामान्यांना दुहेरी फटका सोसावा लागत आहे. या भीषण परिस्थितीत जगावे तरी कसे, असा प्रश्न या सर्वसामान्यांना काही महिन्यांपासून छळत आहे.
पावसामुळे झाली कोथिंबीर खराब
पावसामुळे कोथिंबीर खराब झाली आहे. त्यामुळे कोथिंबीर महागल्याचे संदीप चौधरी यांनी सांगितले. लॉकडाऊनआधी लावलेल्या भाज्या लॉकडाऊनमध्ये विकल्या, तर लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी ५० टक्केच पीक लावल्याने कमी आवक होऊन भाज्यांचे दर वाढले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
पालेभाज्यांची नावे दर
कोथिंबीर (नाशिक) १२० ते १६०
शेपू (नाशिक) ५० ते ६०
कांदापात (नाशिक) ६० ते ७०
पालक १५ ते २०
मेथी (नाशिक) ४०
(दर प्रति जुडी/रु.)
फळभाज्यांची नावे दर
मटार २००
फ्लॉवर १००
कोबी ६०
भेंडी ८०
दोडका ८०
फरसबी १२० ते १४०
घेवडा १०० ते १२०
वांगी ८०
सिमला मिरची ८०
गवार १०० ते १२०
कारली १०० ते १२०
टोमॅटो ६०
बटाटे ४०
मिरची (लवंगी) १०० ते १२०
काकडा मिरची ८०
आले (नवीन) ८०
आले (जुने) १००
(दर रुपये/प्रतिकिलोत)