युतीच्या मेळाव्याकडे भीमसैनिकांचीही पाठ; शिवसैनिकही नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:33 AM2019-03-29T00:33:51+5:302019-03-29T00:34:09+5:30

शहापूर येथील युतीचा मेळावा आटोपल्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या असंतोषाला मोकळी वाट केली. पक्षाचे पदाधिकारी स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागत असतील आणि हा मातोश्रीचा आदेश आहे, असे सांगत असतील, तर तो आदेश आम्ही पाळणार नाही.

Lessons for the All India Congress Movement Shiv Sainik too angry | युतीच्या मेळाव्याकडे भीमसैनिकांचीही पाठ; शिवसैनिकही नाराज

युतीच्या मेळाव्याकडे भीमसैनिकांचीही पाठ; शिवसैनिकही नाराज

Next

कसारा/किन्हवली : भाजपा-शिवसेना महायुतीच्या शहापूर येथील मेळाव्यात शिवसैनिकांनी तीव्र विरोध दर्शवला. मेळाव्यादरम्यान सेनेच्या तालुकाप्रमुखास घेराव घालून शिवसैनिकांना कुणाच्याही दावणीला बांधले जात असेल, तर आम्ही मातोश्रीचाही आदेश पाळणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.
शहापूर येथील युतीचा मेळावा आटोपल्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या असंतोषाला मोकळी वाट केली. पक्षाचे पदाधिकारी स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागत असतील आणि हा मातोश्रीचा आदेश आहे, असे सांगत असतील, तर तो आदेश आम्ही पाळणार नाही. तो आदेश तुम्हीच पाळा. कुणाच्या ताटाखालचे मांजर होऊन आम्ही बंद डोळ्यांनी दूध पिणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी पक्षाचे तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांना गराडा घालून दिला.
महायुतीचा मेळावा घ्यायचा होता, तर तत्पूर्वी शहापूर तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला. शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस करून पंचायत समितीत बहुमताने सत्ता आणली. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून उपसभापतीपद राष्ट्रवादीला दिले. आता लोकसभेसाठी युती केली आहे, तर उपसभापतीपदी निष्ठावंत शिवसैनिक बसवावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या मेळाव्यास मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

डोळखांब भागात शिवसैनिकांचा बहिष्कार
डोळखांब भागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात एल्गार करून प्रचारकामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बुधवारी रानविहीर येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेतला.
गेल्या पाच वर्षांमध्ये पाटील यांनी डोळखांब विभागाकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख नामदेव हरणे, सहकारसेना उपतालुकाप्रमुख हरिभाऊ शिंदे, डोळखांब विभागप्रमुख भास्कर भोईर, जावेद पटेल व शिवसेनेचे सर्व शाखाप्रमुख उपस्थित होते.
पाटील यांनी डोळखांबमध्ये एकही विकासकाम केले नसल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती सहकारसेना उपतालुकाप्रमुख हरिभाऊ शिंदे यांनी दिली.

Web Title: Lessons for the All India Congress Movement Shiv Sainik too angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.