जीव मुठीत घेऊ न विद्यार्थी गिरवतात धडे; भिंत आणि छपरालाही गेले तडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 02:18 AM2019-12-10T02:18:45+5:302019-12-10T02:19:02+5:30
चांदरोटी येथे जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे.
शेणवा : शहापूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदरोटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेले असून छपराच्या स्लॅबचे प्लास्टर पडले आहे. त्यामुळे शाळेची इमारत धोकादायक झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक भीतीच्या छायेत आहेत. शाळेची इमारत शहापूर शिक्षण विभाग धोकादायक घोषित करून केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊ न शिक्षण घ्यावे लागत आहे.
चांदरोटी येथे जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. या शाळेत चांदरोटी गावासह शेकटपाडा, पाचलकरपाडा, कराडे या गावांसह परिसरातील गावपाड्यांतील ११० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेच्या इमारतीची देखभाल-दुरुस्तीच होत नसल्याने दुरवस्था झाली आहे. या शाळेतील दोन वर्गखोल्या या ३५ वर्षांपूर्वीच्या आहेत. तर, काही खोल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत २००३-२००४ व २००४-०५ मध्ये बांधण्यात आल्या आहेत.
इमारतीच्या भिंती पावसाळ्यात पाझरतात, तर छप्परही गळते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना चांदरोटी गावातील एखाद्या घरातच धडे गिरवावे लागतात. शाळेची इमारत धोकादायक आहेच, पण तीन वर्गखोल्यांना तर शिक्षण विभागानेच अतिधोकादायक घोषित केले आहे. त्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत, ठिकठिकाणी स्लॅबचे प्लास्टरही निखळले आहे. तर, इमारतीचा पायाही खचला आहे. छत, खिडक्या यांची पुरती वाट लागली आहे.
या धोकादायक वर्गखोल्यांलगतच्या वर्गातच विद्यार्थी-विद्यार्थिनी दाटीवाटीने बसून जीव मुठीत धरून अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. वर्गखोल्या कोसळण्याच्या भीतीने काही विद्यार्थ्यांना तर व्हरांड्यात बसवले जात आहे. या वातावरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून ही इमारत धोकादायक असल्याचे घोषित करण्यापलीकडे शहापूर शिक्षण विभाग केवळ कागदी घोडे नाचवत आहे. यामध्ये विद्यार्थी भरडले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
चांदरोटी शाळेच्या धोकादायक इमारतीत मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे मुलांच्या जीवाला धोका असून शिक्षण विभागाने याची दखल घेऊन ही जुनी पडझड झालेली इमारत पाडून याठिकाणी नवीन शाळेची इमारत बांधावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
- मालू मांजे, तंटामुक्ती अध्यक्ष, आवाळे-चांदरोटी
चांदरोटी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने या इमारतीच्या काही वर्गखोल्या धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले असून तसा प्रस्ताव ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.
- हिराजी वेखंडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, शहापूर
-------------------
रस्त्याने चालताना बेफाम वेगाने धावणाºया वाहनांचे वाटते भय
ज्येष्ठ नागरिकांची तक्रार : अप्पर पोलीस आयुक्तांचे भाषण थांबवून मांडले गाºहाणे; ज्येष्ठांना सहकार्य करणाºया पोलिसांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्व व पश्चिम रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालक हे ज्येष्ठ नागरिकांशी अत्यंत उद्धट वर्तन करतात. भाडे नाकारतात. कर्णकर्कश हॉर्न वाजवत बेफाम वेगाने रिक्षा व इतर वाहने चालवतात, त्यामुळे रस्त्यावरून चालताना दडपण येते. कधी कुठले वाहन धडक मारेल, याचा नेम नाही, त्यांना शिस्त लावा, असे शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांना गाºहाणे घातले. कराळे यांचे भाषण मध्येच थांबवून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याकडे कैफियत मांडली.
डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी आणि ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी ज्येष्ठांसमवेत पोलिसांच्या संवादाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठांनी कराळेंचे भाषण थांबवून आधी रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या मनमानीचे काय करता ते सांगा, असे विचारले. कराळे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ते म्हणाले की, कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरांतील रिक्षाचालकांबाबत काय करायचे, त्यावर निश्चित विचार केला जाईल. ज्येष्ठांनी एकाकीपणाची भावना बाळगू नये. धकाधकीच्या जीवनात पाल्यांना, नातवांना ज्येष्ठांसाठी वेळ देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुलांनीही वेळात वेळ काढून ज्येष्ठांसमवेत चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले. डोंबिवलीसह अन्य शहरांमधील ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यांमध्ये ज्येष्ठांनी सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. तसेच कोणत्याही पोलीस ठाण्याने ज्येष्ठांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, असे आदेश त्यांनी कल्याण, डोंबिवली पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले. जर पोलीस ठाण्यात तक्रार घेतली गेली नाही तर एसीपी, डीसीपी अधिकाऱ्यांना ज्येष्ठांनी थेट संपर्क साधावा, असेही कराळे म्हणाले.
सायबर क्राइमसंदर्भात अॅड. सुरेंद्र पवार यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मोबाइल हाताळताना काळजी घ्यावी. ज्येष्ठांनी शक्यतो आॅनलाइन पेमेंट करू नये तसेच मोबाइलवर स्वत:ची वैयक्तिक माहिती देऊ नका, सेल्फी काढून स्वत:च्या कुटुंबीयांची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. घराबाहेर जाताना अनोळखी व्यक्तीला माहिती देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की, १०० व १०९० ही हेल्पलाइन असून त्यावर थेट संपर्क करावा, समस्या असल्यास ती सोडवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असेल. ज्येष्ठांनी सतत कार्यमग्न राहावे. उतारवयात तरुणपणी कामाच्या व्यापात राहिलेले छंद जोपासणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश पारखे यांनी २००७ च्या ज्येष्ठ नागरिक कायद्यासंदर्भात पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना केली.
अरुण हेडाव यांनी डोंबिवली ज्येष्ठांकरिता सुरक्षित शहर असल्याची भावना व्यक्त केली. विजया ठाकरे यांनी ज्येष्ठांच्या समस्या मांडल्या, दुसºयांवर विश्वास ठेवा, प्रेम, आपुलकी वाढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कुलकर्णी यांनी केले. ज्येष्ठांना सहकार्य करणाºया पोलीस कर्मचाºयांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
--------------
पहिली कसारा लोकल पहाटे ४ वाजता सोडा
समस्यांवर चर्चा : स्थानक सुधारणा समितीवरील पदाधिकाºयांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पहिली कसारा ते मुंबई या मार्गावर धावणारी लोकल कसारा स्थानकातून पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी सुटते. त्या लोकलची वेळ पहाटे ४ वाजता करावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या स्थानक सुधारणा समितीच्या सदस्या अनिता झोपे यांनी केली. त्यावर लोकल गाड्यांचे परिचालन अधिकारी यासंदर्भात विचारविनिमय करतील आणि आगामी वेळापत्रकात जर शक्य असेल तर सदर लोकलची वेळ बदलण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाºयांनी त्यांना दिले.
स्थानक सुधारणा समितीच्या बैठकीत सदस्यांच्या तीन समस्या, सूचनांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कसारा मार्गावरील प्रवाशांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले. त्या मार्गावरील सदस्या झोपे म्हणाल्या की, पहाटे ३.३० वाजता नवीन कसारा लोकल सुरू करावी, ही मागणी रास्त असून आगामी काळात या मागणीस प्राधान्य देण्यात यावे. मुंबई येथून कसारा मार्गावर रात्री १० वाजून ५० मिनिटांनी व मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुटणाºया दोन लोकल गाड्यांमध्ये बरेच अंतर असून त्या कालावधीत सेकंड शिफ्ट करून परतणाºया चाकरमान्यांना ताटकळावे लागते. त्यामुळे या दोन गाड्यांमध्ये एखादी नवीन लोकल रात्री ११.१५ वाजता मुंबई येथून कसारा मार्गावर सुरू करावी. ती मागणी रास्त असली तरी त्या वेळेमध्ये कल्याण-कसारा मार्गावर सुमारे १२ लांब पल्ल्यांच्या गाड्या धावतात, असे स्पष्टीकरण रेल्वे अधिकाºयांनी दिले. त्यामुळे त्या वेळेत लोकल फेरी वाढवणे अशक्य असून त्यास रेल्वेने नकार दिला. आसनगाव पूर्वेकडील नवीन जिना हा अतिशय गैरसोयीचा असल्यामुळे जुना पाडलेला जिना त्वरित दुरुस्त करावा. नवीन पादचारी पुलावर पूर्व दिशेला स्वयंचलित सरकते जिने व लिफ्टची व्यवस्था करावी, अशी मागणी झोपे यांनी केली.
आसनगाव रेल्वेफाटकाजवळ अंडरपास (सबवे) बनवावा, असेही त्यांनी सुचवले. त्या मागणीवर मात्र रेल्वेच्या अभियंता विभागाशी चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल आणि अहवालानुसार योग्यपद्धतीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाºयांनी दिल्याचे त्या म्हणाल्या.
‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये बुधवारी कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या समस्येसंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचीही दखल रेल्वे अधिकाºयांनी घेतली असून लवकरच या मार्गावरील प्रवाशांच्या प्रमुख समस्या प्राधान्यक्रमाने मार्गी लागतील, असा आशावाद झोपे यांनी व्यक्त केला.