मुलींची छेड काढणाऱ्या तोतया पोलिसाला महिलांनी शिकविला धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 07:02 PM2019-01-03T19:02:24+5:302019-01-03T19:13:37+5:30
एका कार्यक्रमाच्या ठिकाणाहून रात्री उशिरा मुंबईतून ठाण्यात परतणा-या तरुणींची छेड काढणा-या प्रकाश कोठावळे या तोतया पोलिसाची रिक्षा चालकाच्या मदतीने धुलाई करुन या तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने चांगलीच अद्दल घडविल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे ठाण्यात घडला.
ठाणे: कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीवर गुरुवारी पहाटे १.३० वा. च्या सुमारास अश्लील शेरेबाजी करीत तिचा विनयभंग करणा-या प्रकाश कोठावळे (३५) याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या या घृणास्पद कृत्याचा मोठया धाडसाने जाब विचारत या तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने त्याला दुर्गेचा अवतार दाखवून चांगलाच धडा शिकवला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका कार्यक्रमानिमित्त ही तरुणी आपल्या काही मैत्रिणींसह पवई येथील कार्यक्रमासाठी गेली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या दोघीही बुधवारी रात्री उशिरा पवईतून निघाल्या. ठाण्यात येण्यासाठी त्या रिक्षाने मुलूंड चेक नाक्याजवळ उतरल्या. कोपरीमध्ये येण्यासाठी गुरुवारी (३ जानेवारी ) पहाटे १.३० वा. च्या सुमारास दुसरी रिक्षा पकडण्यासाठी ते काही अंतर चालत येत होत्या. त्याचवेळी या तरुणीवर कोठावळे याने अश्लील शेरेबाजी केली. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही त्याने हा प्रकार सुरुच ठेवल्यानंतर तिने धाडस करीत त्याला ‘तुझा काय प्रॉब्लेम आहे?’ असे विचारुन त्याला जाब विचारला. तेंव्हा त्याने उलट तिलाच पकडून तिचा विनयभंग केला. त्यावेळी चवताळलेल्या तिच्या मैत्रिणीने आक्रमक पवित्रा घेतला. दोघींनीही त्याला एका रिक्षा चालकाच्या मदतीने चांगलाच ‘प्रसाद’ दिला. त्यावेळी मात्र पाचावर धारण बसलेल्या कोठावळे याने आपण पोलीस असल्याची बतावणी केली. तरीही त्यांनी आक्रमक पवित्रा सोडला नाही. मग आपण शिवसैनिक असल्याचा त्याने दावा केला. अखेर या मुलीने तिच्या पालकांना हा प्रकार मोबाईलवरुन सांगितला. त्यानंतर त्यालाही काही नागरिकांच्या मदतीने कोपरी पोलिसांच्या स्वाधीन केले. या धुमश्चक्रीत या मुलीच्या मानेलाही त्याने नखाने ओरखडले. त्यांनीही त्याची धुलाई केल्याने तोही यात जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अटक केली जाईल, अशी माहिती कोपरी पोलिसांनी दिली. याप्रकरणी उपनिरीक्षक सुजाता जगताप या अधिक तपास करीत आहेत.