ठाण्यात पोलिसांच्या गणपती बाप्पाने दिले वाहतूक नियमनाचे धडे
By जितेंद्र कालेकर | Published: September 6, 2019 10:22 PM2019-09-06T22:22:50+5:302019-09-06T22:27:59+5:30
एकीकडे वाढीव दंडामुळे पोलीस आणि वाहन चालकांमध्ये संभ्रम असतांना दुसरीकडे वाहतूकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा. आता मोदक आणि पेढयाचा प्रसाद घ्या. पण यापुढे नियम मोडाल तर मात्र दंडाची वाढीव रक्कम भरावी लागेल, असा इशाराच पोलिसांबरोबर असलेल्या गणरायाने वाहन चालकांना ठाण्यात गुरुवारी दिला.
ठाणे: विद्येची देवता असलेला गणराय ठाणेकरांना गुरुवारी एका वेगळयाच रुपात पहायला मिळाला. वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या बेशिस्त चालकांना गांधीगिरीच्या मार्गाने मोदक देत नियम न तोडण्याचा उपदेश वाहतूक पोलिसांसमवेत दिला.
केंद्र शासनाने वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर नियम नियमाप्रमाणे जादा दंड वसूली लागू केली आहे. वाढीव दंडाच्या रक्कमेबाबत अजूनही अनेक वाहन चालक अनभिज्ञ आहेत. परंतू, दंडाची मोठी रक्कम भरण्यापेक्षा वाहतूकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा यातून तुमचाही आणि इतरांचाही जीव वाचेल, अशा प्रकारची जनजागृती ठाणे शहर पोलिसांच्या ठाणेनगर वाहतूक उपविभागामार्फत गुरुवारी करण्यात आली. तीन हात नाका, ठाणे रेल्वे स्थानक आणि चिंतामणी चौक या गर्दीच्या ठिकाणी हेल्मेट न घालणारे, सिग्नल तोडणारे आणि चुकीच्या दिशेने येणा-या वाहन चालकांना ठाणेनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ तसेच जमादार मुश्ताक पठाण, पोलीस हवालदार रविंद्र चव्हाण, भिकन शिरसाठ, राजू सानप, पोलीस नाईक दिलीप मारलिकर आणि भूपेंद्रसिंग राजपूत आदींंच्या पथकाने जनजागृती केली. यावेळी नियम मोडणाºया सुमारे ४० ते ५० वाहनचालकांना गणरायाच्या रुपातील वाहतूक मदतनीसाने मोदक आणि पेढयाचा प्रसाद दिला. पण यापुढे जर तुम्ही नियम मोडाल तर मात्र दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही धुमाळ यांनी यावेळी दिला.
*असे आहेत नविन नियम
विनापरवाना वाहन चालविणे- पाच हजारांचा दंड, भरघाव वेगाने वाहन चालविणे यापूर्वी ४०० रुपयांचा दंड होता. तो आता दोन हजार ते चार हजार करण्यात आला आहे. सिट बिल्ट न घालणाºयांनाही शंभर रुपयांवरुन एक हजारांचा दंड करण्यात आला आहे.
‘‘ नविन नियमानुसार हे हेल्मेट न घालणा-यांनाही शंभर रुपयांवरुन एक हजारांचा दंड आहे. पण वाहन चालकांनीही दंड भरण्यापेक्षा नियम पाळले पाहिजेत. दंड वसूली आणि कारवाई करणे हे आमचे लक्ष्य नाही. तर वाहतूक नियमन करणे आणि नागरिकांची सुरक्षितता राखणे हे कर्तव्य आहे. वाहतूकीचे नियम पाळून अपघात टाळणे गरजेचे आहे.’’
संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणेनगर