येऊ देत आता कितीही रुग्ण, २० बेड केले आहेत सज्ज! औषधांसह ऑक्सिजनचा साठाही तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:01 IST2025-01-08T10:00:50+5:302025-01-08T10:01:27+5:30
कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड

येऊ देत आता कितीही रुग्ण, २० बेड केले आहेत सज्ज! औषधांसह ऑक्सिजनचा साठाही तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाराष्ट्रात नव्या ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर ठाणे जिल्ह्यात या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून २० बेड्सचा विशेष कक्ष सज्ज ठेवला आहे. या कक्षात औषध साठ्यासह ऑक्सिजन साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील २० बेड्सच्या कक्षात पुरेसा औषधसाठा, डॉक्टरांसह इतर पथके सज्ज आहेत. या आजारात सर्दी, ताप, खोकला येणे अशी लक्षणे आढतात. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात २० बेडचा कक्ष उभारला आहे. आणखी १०० बेड्सच्या कक्ष उभारणीचे काम सुरू आहे. औषधांसह ऑक्सिजनचा पुरेसा साठाही आहे.
कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड
या विषाणूबाबत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये या आजाराच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्डही तयार केला आहे.