रेंटलच्या घरापेक्षा हक्काच्या घरात मरू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:26 AM2020-10-02T00:26:21+5:302020-10-02T00:26:42+5:30

बाधित रहिवासी समस्यांच्या गर्तेत : महापालिकेचे दुर्लक्ष, पाच वर्षांपासून मिळाले नाही स्वत:चे घर, सुविधांची वानवा

Let die in the right house rather than the rental house | रेंटलच्या घरापेक्षा हक्काच्या घरात मरू द्या

रेंटलच्या घरापेक्षा हक्काच्या घरात मरू द्या

googlenewsNext

अजित मांडके ।

ठाणे : अतिधोकादायक, धोकादायक, तसेच रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या रहिवाशांना पालिकेने वर्तकनगर आणि मानपाडा येथील दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात हलवले होते. परंतु, पाच वर्षांनंतरही या रहिवाशांना हक्काचे घर मिळू शकले नाही. येथील इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे. सांडपाण्याची दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याची बोंब, वारंवार बंद पडणारी लिफ्ट, कचरा आणि विजेची समस्या अशा अनेक समस्यांच्या गर्तेत अडकल्याने तुम्हीच सांगा आम्ही कसे जगायचे, असा सवाल ते करीत आहेत.

अवघ्या १६० चौ. फुटांच्या घरात दाटीवाटीने पाच ते आठ जणांचे कुटुंब वास्तव्य करीत आहे. १८ आणि २२ माळ्यांच्या इमारती असून प्रत्येक मजल्यावर १० ते ११ खोल्या आहेत. घर लहान असल्याने रहिवासी पॅसेजमध्ये सामान ठेवतात. हीच परिस्थिती वर्तकनगर येथील घरांची आहे. येथील कर्मचारी गायब झाल्याने सुरक्षारक्षकांवर पाणी सोडण्याची जबाबदारी आली आहे. पूर्वी दोन तास येणारे पाणी आता दिवसातून एकदाच तेही अर्धा तासच येत आहे. विजेची समस्या ही नित्याचीच आहे. मानपाडाच्या दोस्ती रेंटलमध्ये दोन इमारती असून याठिकाणी सुमारे २०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथे कचऱ्याचा एकच डबा आहे. सकाळी कचरा उचलला जातो. परंतु दिवसभर तो टाकला जात असल्याने, कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो.

भिवंडीत इमारत कोसळून ३८ रहिवाशांचा जीव गेल्यानंतर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे शहरात साडेचार हजारांहून अधिक धोकादायक इमारती असून यातील अनेक इमारती खाली करून, तेथील रहिवाशांना ठाणे महापालिकेने रेंटलच्या घरांमध्ये हलविले आहे. मात्र, खुराड्याच्या आकाराच्या या घरांमध्ये गेल्यावर या रहिवाशांची अवस्था भीक नको पण कुत्रा आवर याप्रमाणे झाली आहे. वॉटर, मीटर, गटारसह अनेक नानाविध समस्यांमुळे त्यांचे जगणे मुश्कील झाले असून रेंटलच्या घरांपेक्षा धोकादायक इमारतींतील आमच्या हक्काच्या घरांतच आम्हाला मरू द्या, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. या परिस्थितीचा लोकमतने घेतलेला हा आढावा...

रेंटलच्या घरांचे व्यवस्थापक झाले गायब

वर्तकनगर आणि मानपाडा येथील रेंटलच्या घरांतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सहा व्यवस्थापक नेमले होते. परंतु, कोरोनाची साथ सुरू होण्यापूर्वीच हे सर्वच व्यवस्थापक गायब झाले आहेत. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्याकडून आता देखरेख होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे समस्यांमध्ये भर पडली आहे.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी सहा व्यवस्थापकांची नियुक्ती केली होती. कंत्राटी स्वरूपात त्यांच्याकडून काम सुरू होते. ते होते, त्यावेळेस किमान साफसफाई व इतर सोयसुविधा वेळच्या वेळी मिळत होत्या. लिफ्ट तत्काळ दुरुस्त केली जात होती. परंतु, आता ते गायब झाल्याने या सर्वच समस्या आता आ वासून उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे आता तक्रारी कोणाकडे करायच्या, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.
वास्तविक पाहता या व्यवस्थापकांचा कार्यकाळ वाढविण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. परंतु, प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात पालिकेला विचारणा केली असता, त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यांचा कार्यकाळ वाढविण्यासाठी जे सोपस्कार गरजेचे होते, ते महामारीमुळे शक्य झालेले नाही. त्यामुळेच त्यांना पुन्हा सेवेत घेता आले नाही, असे सांगण्यात आले.

घरांत चोºया वाढल्या
ठाणे : वर्तकनगर आणि मानपाडा येथील विस्थापितांना स्थलांतरित केलेल्या रेंटलच्या घरांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असल्याने आता या ठिकाणी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. पंखे, लिफ्टमधील विजेच्या बल्बसह इतर साहित्यांची चोरी आदी घटनांमध्येही वाढ झाली आहे. काही नागरिकांना येथे तीन महिन्यांसाठी विस्थापित केले होते. परंतु, मागील चार ते पाच वर्षांपासून ते रहिवासी येथेच वास्तव्य करून आहेत. एकूणच एक नाही तर अनेक समस्यांना येथील रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे.

कोरोनाच्या काळापासून आमचे हाल आणखी वाढले आहेत. महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. लिफ्ट वारंवार बंद पडत आहे. पाण्याची समस्या नित्याचीच झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही.
- सचिन दिवेकर, स्थानिक रहिवासी

खुराड्यामुळे कुटुंबव्यवस्थेला तडा
दाटीवाटीने वास्तव्य : लग्नकार्यात अडचणी

ठाणे : शहरातील बाधितांना महापालिकेने ज्या घरांमध्ये हलविले आहे, ती घरे अवघी १६० चौरस फुटांची आहेत. एखाद्याच्या घरात लग्नकार्य काढायचे झाले, तर आधी त्याची व्यवस्था कशी करायची, त्याला मुलगी मिळेल का, मुलीने होकार दिलाच तर नवरदेवासाठी पर्यायी घर भाड्याने घेण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्यामुळे त्यांची कुटुंबव्यवस्थाच धोक्यात आल्याने ते हक्काच्या घरासाठी आस लावून आहेत. चार ते पाच वर्षांपूर्वी शहरातील सुमारे ४०० कुटुंबांना मानपाडाच्या दोस्ती रेंटलमध्ये हलविले होते.

वर्तकनगर येथील रेंटलच्या घरातही शेकडो कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. परंतु, आधीच विविध समस्यांनी ग्रासलेल्या येथील रहिवाशांना आपल्या मुलांचा तरी संसार नव्याने सुरू होईल का, या चिंतेत टाकले आहे. आधी मोठे घर किंवा तळ अधिक एक मजल्याचे घर असल्याने त्या घरात सर्वांना थोडी मोकळीक मिळत होती. परंतु, आता हक्काचे घर मोडले गेल्याने येथे तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या अवघ्या १६० चौरस फुटांच्या घरात सामान कुठे ठेवायचे, घरातील मंडळींनी कुठे झोपायचे, असा पेच रहिवाशांना वारंवार सतावत आहे.

घरांचा आकार कमी असल्याने काहींनी थेट पॅसेजमध्ये आपले संसार थाटले आहेत. एखाद्या घरातील मुलगा लग्नाचा झाला, तर त्याला लग्न करणे शक्य होत नाही. आधीच घरात सात ते आठ माणसे असल्याने एखादा माणूस वाढला, तर घरातील कोणते सामान बाहेर ठेवायचे, त्या नव्या माणसाला कसे सामावून घ्यायचे, असा पेच त्यांना सतावत आहे. एखाद्या मुलाला मुलीने पसंत केले, तर त्याला दुसरीकडे भाड्याने घर घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. भाड्याने घर घेण्याची ऐपत नसेल, तर काहींची लग्नकार्येदेखील मोडली आहेत.

Web Title: Let die in the right house rather than the rental house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे