कळवा रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणा वेळच्या वेळी केली जाते अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:56 AM2021-01-13T02:56:28+5:302021-01-13T02:56:51+5:30
भंडारा दुर्घटनेच्या दाेन दिवसांपूर्वीच रिफील : सुरक्षारक्षकांचा मात्र अभाव
अजित मांडके
ठाणे : भंडाऱ्यातील रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेत १० बालकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर शासकीय रुग्णालयातील फायर फायटर सिस्टीम अपडेट आहे किंवा नाही, याचीही माहिती घेतली जात आहे. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केली असता त्या ठिकाणी असलेली अग्निरोधक यंत्रणा भंडारामध्ये घडलेल्या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच रिफिल केल्याचे दिसून आले.
येथील सुरक्षारक्षकांसह, शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही ते सिस्टीम कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण दिले आहे. ज्या ठिकाणी ही यंत्रणा बसविली आहे, त्या प्रत्येक अग्निरोधक यंत्राच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला होता. महापालिकेच्या या रुग्णालयावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाचादेखील ताण आहे.
यंत्रे ९०, परंतु साठा नाही
रुग्णालयाच्या दोन मजल्यांवर ९० अग्निरोधक यंत्रणा बसविल्या आहेत. ते तळमजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत बसविलेले आहेत. सुटसुटीत जागेत हे यंत्र बसविली आहेत. परंतु, त्यांचा साठा करणे शक्य नसल्याने तो केला जात नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, असे असले तरी सुरक्षेबाबत काेणतीही हयगय करण्यात आलेली नाही. त्यासाठी याेग्य नियाेजन करण्यात आलेले असल्याचेही स्पष्ट केेले.
साधा धूर आला तरी यंत्रणा हाेते सतर्क
कळवा रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणा सक्षम आहे, येथील सुरक्षारक्षकांना याचे प्रशिक्षणही दिलेले आहे. तसेच आता शिकाऊ डॉक्टर आणि इतर महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अग्निशमन विभागाला कळविलेले आहे. साधा धूर आला तरी येथील यंत्रणेला काही क्षणांत कळते.
- डॉ. भीमराव जाधव, अधिष्ठाता,
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
प्रशिक्षण दिले जाते
या रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना याचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे. हे यंत्र कसे हाताळायचे याचीही माहिती त्यांना दिली आहे. प्रत्येक यंत्र हाताला लागेल अशा अंतरावर बसविलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक असल्याचा दावा प्रशासनाने केला. परंतु, प्रत्यक्ष पाहणीत या यंत्राच्या ठिकाणी एकही सुरक्षारक्षक आढळला नाही.
कर्मचाऱ्यांना हाताळणीत अडचणी नाहीत
अग्निरोधक यंत्रणा कशी हाताळायची याची माहिती येथील सुरक्षारक्षकांना असल्याचे त्यांच्याशी चर्चा केल्यावर स्पष्ट झाले. यंत्र कसे खोलायचे, कोणते बटन दाबायचे याची माहिती त्यांना असल्याचेही दिसून आले. अग्निशमन विभागामार्फत त्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. शिकाऊ डॉक्टर, कर्मचारी यांना अग्निरोधक यंत्रणा हातळण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.
दोन मजल्यांची ही इमारत असून या ठिकाणी ९० अग्निरोधक यंत्रे बसविण्यात आली आहेत. तर स्मोक डिटेक्टर आणि इतर अग्निरोधक यंत्रणाही सक्षम असल्याचे दिसून आले. या ठिकाणी साधा धूर जरी आला तरी तो कोणत्या मजल्यावरून, कोणत्या विभागातून, कोणत्या खोलीतून आला, याची माहिती अगदी काही क्षणात तळमजल्यावर असलेल्या अग्निशमन विभागाच्या कक्षाला उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.