मुलांना आवडीनिवडींविषयी व्यक्त होऊ द्या, सलील कुलकर्णी यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:28 AM2019-03-20T03:28:22+5:302019-03-20T03:28:47+5:30

कला क्षेत्रात करिअरचे स्वप्न पाहत असल्यास लहानपणापासूनच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोहचता येते.

 Let the kids express their likes and dislikes, Salil Kulkarni's advice | मुलांना आवडीनिवडींविषयी व्यक्त होऊ द्या, सलील कुलकर्णी यांचा सल्ला

मुलांना आवडीनिवडींविषयी व्यक्त होऊ द्या, सलील कुलकर्णी यांचा सल्ला

googlenewsNext

डोंबिवली - कला क्षेत्रात करिअरचे स्वप्न पाहत असल्यास लहानपणापासूनच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोहचता येते. पण मुलांना आपल्या आवडीच्या करिअरबाबत काहीच बोलूच दिले जात नाही, अशी खंत संगीतकार सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मधुमालती एन्टरप्रायझेस, मुक्तछंद क्रिएशन्स आणि अभिव्यक्ती फाउंडेशन यांच्या वतीने ‘थेट भेट’ हा कार्यक्रम शनिवारी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात झाला. त्यावेळी कुलकर्णी बोलत होते. कुलकर्णी यांनी वीस वर्षांतील कारकीर्दीतील आपल्या आठवणींना उजाळा दिला. सौरभ सोहोनी यांनी कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला.
कुलकर्णी म्हणाले की, मुलांना बोलू दिले पाहिजे. पालकांनी मुलांचे ऐकून घेतले तर त्यांचा संपूर्ण प्रवास बदलून जाईल. त्यांच्या पद्धतीने त्यांना फुलू द्यावे. मधली सुट्टी हा कार्यक्रम करताना त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून अनेक किस्से ऐकायला मिळत होते. शिक्षकांच्याही गमतीजमती समजत होत्या. एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या शाळेत केलेल्या चित्रीकरणाचे क्षण सर्वांत हळवे होते. तेव्हा कायम वर्तमानाचे भान ठेवून बोलावे लागत होते. मला लिखाण करताना सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातील अनुभव लिहायला आवडतात. सहजसोपे लिहिणे कठीण असते. जड आणि अलंकारिक लिहिणे सोपे असते. स्टेजवर नेहमी गाता येणारी गाणीच गाण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
‘कवितेचे गाणे होताना’च्या आठवणीही त्यांनी शेअर केल्या. विंदा, शांता शेळके, सुधीर मोघे, ग्रेस, कुसुमाग्रज अशा अनेक कवींच्या कविता आणि गाणी त्याने यावेळेस सादर केली.
सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. डोंबिवलीमध्ये सादरीकरण करायला आल्यावर घरी आल्यासारखं वाटत असल्याचे सांगून रसिक प्रेक्षकांचेही त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अपूर्वा प्रभू यांनी महिला दिनी जीटी रुग्णालयात रांगोळी काढून कुलकर्णी यांचे ‘नसतेस घरी तू जेव्हा’ हे गाणे त्यासोबत लिहिले होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी हे गीत सादर केले.

‘रिमेक गाणी म्हणजे सांस्कृतिक आळस’

कल्याण : रिमेक हा प्रकार मला फारसा पटत नाही. माझ्या दृष्टीने रिमेक गाणे करणे हा सांस्कृतिक आळस आहे, असे मत संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. संगीत आणि साहित्याचे वातावरण लहानपणापासूनच घरात होते. पण संगीत क्षेत्रात करियर करायचे हे लहानपणी ठरविले नव्हते. पेशाने डॉक्टर आहे; मात्र मी संगीत क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. वारसा हक्काने मला संवदेनशीलता आणि वाचनाचे संस्कार मिळाले. माझा बालगीतांचा अल्बम पु.लं.ना खूप आवडला होता.
तो पु.लं. आणि सुनीता देशपांडे यांच्यासमोर सादर करण्याची संधी मला मिळाली होती. सुभेदारवाडा कट्टा, अपूर्वा प्रोडक्शन व पी.आर. क्रिएशन यांच्या ‘गप्पा टप्पा आणि गाणी विथ सलील कुलकर्णी’ या कार्यक्रमात शनिवारी गौरी भिडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. सुभेदार वाडा शाळेत झालेल्या या कार्यक्रमाला कल्याणकर नागरिकांनी गर्दी केली होती. कल्याण गायन समाज अध्यक्ष राम जोशी यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. सुभेदारवाडा कट्ट्याचे दीपक जोशी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Let the kids express their likes and dislikes, Salil Kulkarni's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.