मला बी शाळेला येऊ द्या की रं! घरातील विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:52 PM2020-09-05T16:52:59+5:302020-09-05T16:54:31+5:30

विद्यार्थी, कार्यकर्ते, जागरुक नागरिक यांचा निर्धार - आम्ही शाळेत येणार!!!

Let me come to B school or Ran, teacher's day occasion in front of corona | मला बी शाळेला येऊ द्या की रं! घरातील विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी निर्धार

मला बी शाळेला येऊ द्या की रं! घरातील विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी निर्धार

googlenewsNext
ठळक मुद्देपाटी नी पेन्सिल घेऊ द्या की रं! मला बी शाळेला येऊ द्या की रं!

ठाणे : पाटी नी पेन्सिल घेऊ द्या की रं! मला बी शाळेला येऊ द्या की रं! असं म्हणत समता विचार प्रसारक संस्थेने आज ठाण्यात शिक्षक दिनी, तीन ठिकाणी प्रतीकात्मक पद्धतीने प्रत्यक्ष पुस्तके हातात धरून, मोबाईल शिवाय शाळा भरवली! हरी ओम नगर जवळील डम्पिंग ग्राउंड, साई साफल्य सोसायटी, कोपरी आणि खारटण रोड या ठिकाणी भरवलेल्या या शाळेत एकूण सुमारे ६० विद्यार्थी सामील झाले. डॉ संजय मंगला गोपाळ, जगदीश खैरालिया, सीमा श्रीवास्तव आदींनी या शाळेत शिकवले. मुलांनी धडे वाचले. महात्मा जोतिबा फुल्यांचे अखंड गायन करण्यात आले. अजय भोसले, प्रवीण खैरालिया आणि सुनील दिवेकर यांनी या शाळांचे आयोजन केले होते. घरात मोबाईल नाही. मोबाईल असेल तर तो बाबांकडे कामावर. कधी वीज नाही तर कधी नेट नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन शाळा सुरु असली तरी आम्ही ऑफलाईनच आहोत,अशी खंत मुलांनी यावेळी व्यक्त केली. आमची नियमित शाळा सुरु करा, अशी एकमुखी मागणी विद्यार्थ्यांनी सर्वत्र केली. या उपक्रमात संतोष चौधरी तसेच रवि आयझॅक, प्रतिक गावडे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.

सप्टेंबर महिना सुरू झाला तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत. कोविड-१९ हे त्यासाठीचे कारण आहे. मात्र त्यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे व त्यासाठी निरनिराळी अॅप्स उपलब्ध केली आहेत. त्यासाठी जिओ, गूगलसारख्या बड्या कंपन्यांना शिक्षणक्षेत्राचे दरवाजे खोलून दिले आहेत. खास करून शहरी भागातल्या काही शाळा त्याआधारे कशाबशा चालू आहेत. अॅक्टिव्ह टीचर्स फोरम या गटाने केलेल्या राज्यस्तरीय सर्वेक्षणानुसार सरासरी ४५% मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन असले तरी केवळ २७% पालकांकडे इंटरनेटची जोडणी आहे. हे स्मार्टफोन्स पालक कामाला जातात तेव्हा घेऊन जातात, मुलांना तो मिळत नाही. मिळाला तरी त्यावरचे शिक्षण रंजक वाटत नाही कारण ते एकतर्फी असते. मुले व शिक्षक परस्पर संवादाचा अभाव असतो. ग्रामीण भागात दिवसांतल्या १२ तासांहून अधिक वेळ विजेचा पत्ता नाही, फोन चार्जिंगच्या समस्या असतात. म्हणजेच ऑनलाईन शिक्षण हे शिक्षण म्हणता येणार नाही. फार तर शिक्षक बालक संपर्काचे एक साधन म्हणून त्याला त्याकडे पाहता येईल. ऑनलाईन शिक्षणाचा उपाय बहुतांश ठिकाणी उपयुक्त नसल्याने शिक्षण-संधींची समानता या तत्त्वालाच मोठा धक्का बसतो. 

जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्यांच्यावरही गंभीर विपरीत परिणाम होत आहेतच. ऑनलाईन असो वा ऑफलाईन, मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेबाहेर राहिल्यामुळे, लॉकडाऊनच्या परिणामी मानसिक व आर्थिक स्थैर्य गमावलेल्या पालकांकडूनच मुलांना मारहाण, अत्याचार, अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचार, प्रामुख्याने मुलींचे शिक्षण थांबणे, बालविवाह वाढणे, मुलांवर येणारा मानसिक ताण, पोषण आहारासारखे उपक्रम थांबल्यामुळे वाढणारे कुपोषण, बालमजुरीत ढकलली जाणारी मुले व त्यांचे होणारे शोषण, असे अनेक गंभीर परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहेत, जे कोविडपेक्षाही भयानक आहेत. त्यामुळेच, शाळा, मग त्या औपचारिकपणे असोत वा अनौपचारिकपणे; पूर्णपणे सुरक्षितता पाळून तत्काळ सुरू होणे आवश्यक आहे. मात्र या संदर्भात राज्य शासन केंद्र शासनाकडे बोट दाखवते, जिल्हा परिषदा राज्यशासना कडे आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांकडे. ही परिस्थिती भयावह आहे. एका मोठ्या सामाजिक समस्येच्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे. शिवाय आता सर्व सार्वजनिक उपक्रम सुरू झालेले असल्याने सर्व दक्षता घेऊन व सुरक्षितता पाळून शाळा तत्काळ सुरू करण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे. यासाठीच शिक्षकदिनी, ५ सप्टेंबर २०२० ला राज्यभर अनेक शिक्षण संस्था, शिक्षक, पालक, जागरुक नागरिक, सामाजिक संस्था-संघटना-कार्यकर्ते यांनी अशा शाळा सुरु करून निर्धार केला की - 

-    आम्ही आमच्या भागातील शाळा, जेथे जसे शक्य आहे त्याप्रमाणे सुरू करू.

-    जेथे शक्य आहे तेथे शाळेतच, सुरक्षित अंतर व अन्य नियम पाळून, आवश्यकतेनुसार सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे न बोलावता योग्य त्या संख्येच्या गटाने बोलावून.

-    शाळेत शक्य नसल्यास गावातील कुठल्याही योग्य त्या ठिकाणी – समाजमंदीर, ग्रामपंचायत अथवा अन्य सभागृह किंवा अगदी झाडाखाली सुद्धा!

-    त्यासाठी आम्ही पालक, शिक्षणसंस्था आणि ग्रामपंचायत / ग्रामसभा यांची सहमती घेऊ.

-    जेथे शाळा भरवणे शक्य नाही तेथे वाचनालय, छोट्या गटांमध्ये अभ्यास सत्रे, कृतीसत्रे, खेळ, शिक्षकांनी फोनवरून किंवा घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांचे शैक्षणिक काम सुरू करणे, परिसराधारित अनौपचारिक शिक्षण, वरच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी खालच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे व त्याला शालेय अभ्यासक्रमाशी जोडणे, असे जे शक्य आहे ते आम्ही करू.

Web Title: Let me come to B school or Ran, teacher's day occasion in front of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.