‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की अकरा....’; घर गाठण्याकरिता प्रत्येकाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:26 AM2021-01-02T00:26:04+5:302021-01-02T00:26:13+5:30
ठाणे जिल्ह्यात नववर्षाला रस्ते सुनसान : घर गाठण्याकरिता प्रत्येकाची धडपड
ठाणे : नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता हॉटेल, पब्ज, धाबे येथे जमणारे पहाटेपर्यंत धिंगाणा करतात. रस्त्यांवर चित्कार करीत अनेक जण फटाक्यांची आतषबाजी पाहतात. सोसायट्यांच्या गच्चीवर उशिरापर्यंत गायनाचे व भोजनाचे कार्यक्रम हास्य-विनोदाच्या साथीने रंगतात. मात्र, यंदा हॉटेलात जेवण घेणारे घड्याळाकडे वरचेवर पाहत घास गिळत होते. रस्त्यावर चिटपाखरू नव्हते व जे होते ते पोलिसांचा दंडुका पडू नये, याकरिता दुचाकी पिटाळत होते. गच्चीवर अंधार तर घराघरात टीव्हीचा हाय व्हॉल्युम हे यंदाचे चित्र होते.
दिवाळीत खरेदीकरिता जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात हजारो लोक रस्त्यावर उतरले. मात्र, तरीही कोरोनाचे रुग्ण तुलनेनी फारसे वाढले नाहीत. नवीन वर्षाच्या स्वागताकरिता पुन्हा हजारो लोक रस्त्यावर उतरले, तर कोरोना वाढण्याची भीती असल्याने सरकारने कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने व ब्रिटनहून शेकडो नागरिक जिल्ह्यात आल्याने भीतीचे वातावरण होते. अर्थात, रात्रीच्या संचारबंदीवर टीका झाली, तर नववर्षाच्या स्वागतामध्ये हॉटेल व्यावसायिकांना व्यवसायाची संधी दिसत असल्याने ते हिरमुसले झाले.
या पार्श्वभूमीवर संचारबंदी किती प्रभावीपणे राबवली जाईल, याबाबत शंका व्यक्त होत होत्या. थर्टी फर्स्टला मार्गशीर्षातील गुरुवार आल्याने अनेकांनी सेलिब्रेशनचे बेत रद्द केले. मात्र, पोलीस पीपीई किट घालून प्रत्येक प्रवाशाची नोझल वापरून तपासणी करणार, हे स्पष्ट झाल्यावर गेले काही दिवस कोरोनामुळे तळीरामांची तपासणी बंद झाल्याने सैलावलेले मद्यप्रेमी सावध झाले. अनेकांनी अकरापूर्वी आपली पार्टी उरकली किंवा बंद खोलीत मैफल जमविली.