आयलानी देणार राजीनामा, महापौरपदाचा तिढा सुटण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:15 AM2018-08-15T03:15:45+5:302018-08-15T03:15:59+5:30
मीना आयलानी दोन दिवसांत महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओमी कलानी यांना दिल्यावर, त्यांनी असहकार्याची भूमिका मागे घेतली.
उल्हासनगर - मीना आयलानी दोन दिवसांत महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओमी कलानी यांना दिल्यावर, त्यांनी असहकार्याची भूमिका मागे घेतली. यामुळे विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुका शांततेत होऊन भाजपा-ओमी टीम व साई पक्षाचे सर्वच समिती सभापतीपदावर उमेदवार निवडून आले.
उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची महाआघाडी सत्तेवर आली. तेव्हा भाजपा व ओमी टीमला महापौरपदाची पहिली टर्म प्रत्येकी सव्वा वर्षासाठी विभागून दिली. त्यानुसार आायलानी यांच्या महापौरपदाला ४ जुलैला सव्वा वर्ष झाल्यावर ओमी टीमकडून महापौरपदाच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. आयलानी महापौरपदाचा राजीनामा देत नसल्याने ओमी कलानींसह समर्थक नगरसेवक व पदाधिकारी संतप्त झाले.
पंचम कलानींच्या महापौरपदाला खोडा घालण्याऱ्या साई पक्षाच्या उमेदवारांना असहकार्य करण्याची भूमिका घेतली. तसेच भाजपा गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी मतदानासाठी काढलेला व्हीप नाकारण्याची धमकी दिली. कलानी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पालिकेची सत्ता हातून जाण्याची भीती भाजपा गोटात निर्माण झाली. अखेर राज्यमंत्री चव्हाण यांनी आयलानी महापौरपदाचा राजीनामा माझ्याकडे देणार असल्याचे सोमवारी मध्यरात्री सांगितले.
महापौरपदाचा राजीनामा आयलानी देणार असल्याचे आश्वासन चव्हाण यांच्याकडून मिळाल्यावर ओमी टीमच्या समर्थक नरगरसेवकांनी महाआघाडीच्या सर्वच उमेदवारांना मतदान करत निवडून आणले. बांधकाम समिती सभापतीपदी साई पक्षाच्या कविता पंजाबी, नियोजन समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या मीना सोंडे, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी भाजपाच्या सरोजनी टेकचंदानी, सार्वजानिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी साई पक्षाच्या इंदिरा उदासी, प्राथमिक व माध्यमिक समिती सभापतीपदी ओमी टीमचे रवी जग्यासी, गलिच्छ वस्ती नियोजन समितीच्या सभापतीपदी साई पक्षाचे गजानन शेळके, क्रीडा समितीच्या सभापतीपदी ओमी टीमच्या गीता साधवानी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ओमी टीमच्या छाया चक्रवर्ती तर महसूल समितीच्या सभापतीपदी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी निवडून आल्या आहेत. पिठासीन अधिकारी म्हणून मुंबईचे अप्पर जिल्हाधिकारी हिरालाल सोनावणे यांनी काम पाहिले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लागले लक्ष
मीना आयलानी या राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर चव्हाण, भाजपा, ओमी टीम व साई पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा करून पक्षाला महापालिकेत स्पष्ट बहुमत आहे का? महापौर निवडणुकीत दगाफटका होणार नाही ना? आदीची चाचपाणी घेणार आहेत. त्यांना बहुमताची खात्री झाल्यानंतर ते आयलानी यांना स्वत: महापौर पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर करण्याचा आदेश देणार आहेत.
राजीनामा देण्याचा आदेश
महापौरपद ओमी टीमला देण्यासाठी मीना आयलानी यांना महापौरपदाचा राजीनामा देण्याचा आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून आल्याची माहिती कुमार आयलानी यांनी दिली. पक्षाचा आदेश अंतिम असल्याचे आयलानी यांनी सांगितले.
अखेर मुख्यमंत्र्यांनी
शब्द पाळला
ओमी टीमला महापौरपद मिळणार असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्याचे ओमी कलानी यांनी
सांगितले.