जिल्ह्याच्या विकासाकरिता सर्वमिळून भरीव योगदान देऊया; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 12:34 PM2022-01-26T12:34:48+5:302022-01-26T12:34:59+5:30

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील साकेत मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री शिंदे बोलत होते.

Let us all contribute to the development of the thane district; Appeal of Guardian Minister Eknath Shinde | जिल्ह्याच्या विकासाकरिता सर्वमिळून भरीव योगदान देऊया; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

जिल्ह्याच्या विकासाकरिता सर्वमिळून भरीव योगदान देऊया; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, पिण्याचे पाणी, मुलभूत पायाभूत सुविधांसाठी आणि जिल्ह्याच्या विकासाकरिता आपण सर्वजण मिळून भरीव योगदान देऊया. प्रशासनाच्या सज्जतेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करीत कोरोनाला रोखूया, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.  

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील साकेत मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, पोलिस आयुक्त जयजीत सिंह, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबिय, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबिय, लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना शुभेच्छा देत पालकमंत्री शिंदे यांवेळी म्हणाले, वर्षभरापासून लसीकरणाच्या साथीने कोरोनावर मात करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी ऑक्सिजनची तिप्पट उपलब्धता, ग्रामीण भागात कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्याची ग्वाही देतानाच लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना दरमहा अकराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच कोवीडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना रु. पाच लाखांची मदत देण्यात आली आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या 41 बालकांना केंद्र शासनाच्या योजनेतूनही मदत देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याने वर्षभरात कृषी, उद्योग, गृहनिर्माण, नगरविकास अशा विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत देशात आणि राज्यात नावलौकिक मिळविला आहे. देशातील सर्वांत स्वच्छ शहरांच्या यादीत आपल्या जिल्ह्यातील नवी मुंबईने पहिला क्रमांक मिळविला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ठाणे महापालिकेने पुरस्कार मिळविला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी देखील स्वच्छता अभियानात भरीव कामगिरी करून देशपातळीवर आपल्या शहरांचे पर्यायाने जिल्ह्याचे नाव झळकवले आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. शेती आणि शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस आणण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल या अभियान राबविले जात आहे.  रानभाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना होण्यासाठी आणि आदिवासी शेतकरी बांधवांना हक्काचे रोजगाराचे साधन मिळण्यासाठी रानभाज्या महोत्सव उपयुक्त ठरत असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सन 2022-23 साठी राज्यस्तरीय बैठकीत वाढीव वार्षिक निधीची मागणी केली होती. त्यास उपमुख्यमंत्री  यांनी मंजुरी दिली असून एकूण 475 कोटी रुपयांचा आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अजून वाढीव निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक निधीतून ठाणे जिल्ह्यातील पोलीसांसाठी वाहनांचे वाटप करण्यात आले आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या 13 वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देणारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय पहिले आयुक्तालय असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील एकूण 2 लाख 75 हजार 575 घरांना वैयक्तिक नळ जोडणीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 38 हजार 436 कुटूंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल या योजनेनुसार ठाण्यातील कोपरी येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. याप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुले उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोरोनामुळे निधन झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती पत्राचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्तच्या बॅजेसचे वितरण करण्यात आले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण
दरम्यान, आज सकाळी सव्वा सात वाजता जिल्हाधिकारी  नार्वेकर यांच्या निवासस्थानी ध्वाजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी सीमा नार्वेकर, त्यांचे कुटुंबिय जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
सकाळी सव्वा आठच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रोहयो उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी रोहीत राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, राजाराम तवटे आदी यावेळी उपस्थित होते. 

Web Title: Let us all contribute to the development of the thane district; Appeal of Guardian Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.