एकत्र येत नैराश्यावर मात करू या; आनंदाचा प्रसार करू या

By admin | Published: April 10, 2017 05:42 AM2017-04-10T05:42:14+5:302017-04-10T05:42:14+5:30

डान्स वॉकेथॉन, सायक्लोथॉन, बाईकेथॉन, म्युझिकल फिटनेस, म्युझिक थेरपी, लाफ्टर थेरपी, ध्यानधारणा आणि योग

Let's overcome the frustration; Let's spread happiness | एकत्र येत नैराश्यावर मात करू या; आनंदाचा प्रसार करू या

एकत्र येत नैराश्यावर मात करू या; आनंदाचा प्रसार करू या

Next

ठाणे : डान्स वॉकेथॉन, सायक्लोथॉन, बाईकेथॉन, म्युझिकल फिटनेस, म्युझिक थेरपी, लाफ्टर थेरपी, ध्यानधारणा आणि योग अशा विविध कार्यक्रमांनी ‘फुलपाखरू’ हा उपक्रम पार पडला. मनोरुग्णांनी नैराश्यावर सादर केलेले शॅडो अ‍ॅक्ट सर्वांनाच भावले. या वेळी त्यांनी नैराश्य हे आपल्यावर सावलीसारखे येते. त्यामुळे ही सावली बोलून, उपचार करून दूर करता येऊ शकते, हे त्यांनी आपल्या कलाकृतीतून सांगितले.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे व सिद्धान्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी तीनहातनाका, सर्व्हिस रोड येथे हा कार्यक्रम पार पडला.
एकत्र येऊन नैराश्यावर मात करू या, आनंदाचा प्रसार करू या, असे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. सामाजिक अवघडलेपण न बाळगता लोकांना आपल्या चिंतांबाबत मोकळेपणे बोलावे, यावर ‘फुलपाखरू’मध्ये भर देण्यात आला.
मनोरुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी नैराश्यावर आधारित नृत्य, तर मनोरुग्णांनी या वेळी योगा सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, फ्लॅश मॉब या कार्यक्रमांबरोबर हिपॉप, झुंबा, बेलीफिट यासारखे विविध नृत्यप्रकार या वेळी सादर झाले. फाल्कन आर्टच्या १०० विद्यार्थ्यांनी वॉल पेंटिंग्जच्या माध्यमातून फुलपाखरू रेखाटले. यात मनोरुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण यांच्यासह काही ज्येष्ठ महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. मानसोपचारतज्ज्ञ आणि व्यावसायिक समुपदेशकांनी या वेळी नैराश्यावर आधारित वैयक्तिक सत्रे घेतली. ‘नैराश्य हा आजार वणव्याप्रमाणे पसरत चालला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांमध्ये हा विकार अधिक प्रमाणात आढळतो. परिणामी, ते गोंधळलेल्या मन:स्थितीत असतात. दुसऱ्या बाजूला पालकांकडून मुलांवर देण्यात येणाऱ्या अवास्तव शैक्षणिक दबावामुळे ही मुले वस्तुस्थितीपासून लांब जातात आणि त्यांना नैराश्य येण्याची शक्यता असते, हे या वेळी सांगण्यात आले. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, ठाणे
मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी (मानसोपचारतज्ज्ञ) डॉ. अंजली देशपांडे, सिद्धान्त प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज व साधना प्रधान आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आजीबार्इंनी रंगवले चित्र, लुटला नृत्याचाही आनंद
सर्व्हिस रोड येथील हिरवळीवर बसून लहान मुलांबरोबर ज्येष्ठ नागरिकांचाही चित्रकलेचा तास रंगला होता. हे ज्येष्ठ नागरिक होते, सिद्धान्त प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या निराधार ज्येष्ठ महिला व पुरुष. केवळ त्यांनी रंगकाम नव्हे, तर नृत्याचाही आनंद लुटला. आम्ही शाळेत कधी गेलो नाही. त्यामुळे चित्र काढण्याचा कधी प्रश्नच आला नाही. आज या कार्यक्रमानिमित्ताने मी फुलदाणी रंगवली. हे चित्र मी जपून ठेवणार आणि घरी गेल्यावर सर्वांना दाखवणार, असे ८५ वर्षीय आनंदी शिंगोडे या आनंदाने सांगत होत्या. लक्ष्मी पवार नावाच्या आजीबार्इंनी रंगवलेला देखावा त्या सर्वांना आवर्जून दाखवत होत्या. काठी टेकत आलेल्या ७३ वर्षीय द्रौपदा यादव यांनी मात्र नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच, स्वत:चे फोटोही काढले. नृत्य करून मला बरे वाटले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

एकमेकांवर प्रेम करा, दुसऱ्यांना नेहमी हसवत ठेवा. नैराश्येत असलेल्यांना त्यातून बाहेर येण्यासाठी मदत करा, त्यांच्याशी संवाद साधा, हाच उद्देश या कार्यक्रमातून आम्ही साध्य केला.
- साधना प्रधान, संस्थापिका, सिद्धान्त प्रतिष्ठान

ज्येष्ठ नागरिक आधी यायला तयार नव्हते. नंतर, जेव्हा त्यांनी आम्ही दिलेले चित्र रंगवले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
- वंदना पवार, कलाशिक्षिका

Web Title: Let's overcome the frustration; Let's spread happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.