राजकारण बाजूला ठेवून काेराेनाकाळात एकत्र या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:48+5:302021-04-27T04:41:48+5:30
भिवंडी : कोरोना संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन सध्याच्या आणीबाणीला सामोरे जायला हवे, असे आवाहन खासदार कपिल ...
भिवंडी : कोरोना संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन सध्याच्या आणीबाणीला सामोरे जायला हवे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे. सवाद जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजनपुरवठा करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, असे आवाहनही खासदारांनी जिल्हा प्रशासनाला रविवारी केले.
भिवंडी तालुक्यातील सवाद येथील केंद्रासंदर्भात रुग्ण व नातेवाइकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी रविवारी सवाद केंद्राला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती गुरुनाथ गायकर, उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, राम माळी, श्रीकांत गायकर, दत्तात्रय पाटोळे, यशवंत सोरे, भाजयुमोचे जिल्हा कार्याध्यक्ष जगन पाटील, डॉ. राहुल घुले आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. मात्र, सवाद येथील केंद्रात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा नसल्यामुळे रुग्णांना दाखल करता येत नाही. त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन साठा करून सर्वच्या सर्व ८८० बेडवर रुग्णांना दाखल करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील खेड्यातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच उपाययोजनांमध्ये आरोग्य यंत्रणा तोकडी पडली आहे. या काळात राजकारण करणे योग्य नाही. त्याऐवजी सर्वांनी एकत्रित या आणीबाणीला सामोरे जावे लागले.
ऑक्सिजन प्लांटची पाहणी
केंद्र सरकारने ऑक्सिजन साठ्याबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शनचा वाढीव कोटा दिला आहे. राज्य सरकारही कोरोनासाठी उपाययोजना करीत आहे. नागरिकांनीही सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले. सवाद रुग्णालयात २४ टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. या प्लांटचीही खासदारांनी पाहणी केली. त्यावेळी १ मेपर्यंत प्लांट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.