‘माणूस वाचविण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 05:25 PM2021-05-02T17:25:11+5:302021-05-02T22:37:41+5:30
गेली अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत. पण या घडीला मृत्यूदर नियंत्रणात आणण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा. ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करुया, असे भावनिक आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेली अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत. पण या घडीला मृत्यूदर नियंत्रणात आणण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा. ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करुया, असे भावनिक आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी रविवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे ठाणे शहरातील सर्व खासगी रूग्णालयांच्या डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढत आहे. ही चिंतेची बाब असून तो दर कमी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे, असल्याचे ते म्हणाले. आजपर्यंत आपण सर्वजण एक टीम म्हणून काम करीत आलो आहे. यासाठी माझ्यासह राज्य शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, खासगी किंवा सरकारी सर्वच रुग्णालयांनी कोविडवरील रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना मानसिक धीर दिला पाहिजे, जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल. त्याचबरोबर फायर, विद्युत आणि आॅक्सिजन यंत्रणा आॅडिट करण्याची आवश्यकता आहे. ते केले तर भविष्यात होणारी मोठी हानीही टळू शकते, असेही ते म्हणाले.
* सध्या आॅक्सिजनचा तुटवडा सर्वत्रच आहे. त्यामुळे ज्या रूग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांनाच आॅक्सिजन देण्यात यावा, असे सांगून तातडीच्या वेळी आॅक्सिजनसाठी महानगरपालिका मदत करेल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
* यावेळी डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर देताना त्यांनी ही वेळ एकजुटीने काम करण्याची आहे. माणूस वाचविण्यासाठी शर्थीने प्रयत्न आणि त्यांना मानसिकरित्या धीर देण्याचीही आहे. त्याचबरोबर कोविड काळात सुरु असलेल्या कामाबद्दल डॉक्टरांसह सर्वांचे अभिनंदन केले.
* प्रारंभी महापौर नरेश म्हस्के यांनी डॉक्टरांशी संवाद साधताना कोविड काळात काम करताना काय अडचणी येत आहेत याचा आढावा घेतला. महापालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. कोविड असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो ठाणे महानगरपालिका सातत्याने डॉक्टरांच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि यापुढेही सोबत राहील,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
* महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील डॉक्टरांनी केलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली असून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी खासदार राजन विचारे हेही उपस्थित होते.