विधी व न्याय विभागाने धाडले न्यायालयाला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 01:11 AM2020-11-22T01:11:27+5:302020-11-22T01:12:05+5:30
राकेश पाटील हत्या प्रकरण : विशेष सरकारी वकील नेमण्याची केली हाेती मागणी
अंबरनाथ : मनसेचे उपशहरप्रमुख राकेश पाटील यांंच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी राकेश पाटील यांच्या भावाने केली होती. या प्रकरणी विधी व न्याय विभागाने या पत्राच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयाकडे पाठविले आहे.
डी. मोहन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जैनम रेसिडेन्सी परिसरात राकेश पाटील यांंची २८ ऑक्टोबर रोजी हत्या केली होती. या हत्येनंतर काही आरोपी लागलीच पकडले गेले.
मात्र, डी. मोहन आणि त्याच्यासोबतचे आणखी दोन आरोपी फरार झाले होते. त्यांना पनवेल येथून अटक करण्यात आली. या हत्येतील सर्व मारेकरी अटकेत असून त्यांना न्यायालयाने योग्य शासन द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. १३ नोव्हेंबरला राकेश याचा भाऊ अजय पाटील याने राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पत्र देत या हत्या प्रकरणात आरोपींचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी ॲड. संजय बी. मोरे या विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी केली. या पत्राची दखल घेत शासनाने हे पत्र ठाणे जिल्हा न्यायालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. त्यामुळे पाटील कुटुंबीयांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील मिळणार किंवा कसे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान , शुक्रवारी आराेपींना न्यायालयात हजर केले तेव्हा संतप्त झालेल्या राकेशच्या कुटुुंबीयांनी आराेपींच्या दिशेने चप्पल भिरकावली हाेती.