लेडिज स्पेशल लोकलच्या मागणीला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:40 AM2019-12-19T00:40:57+5:302019-12-19T00:41:00+5:30
नवीन वेळापत्रक गैरसोयीचे : प्रवाशांनी मांडल्या व्यथा
डोंबिवली : मध्य रेल्वेने अमलात आणलेल्या लोकलच्या नवीन वेळापत्रकात लोकलच्या वेळा मागे-पुढे केल्या आहेत. तर, काही लोकल सुटण्याचे स्थानक बदलून आणखीनच गैरसोय केली आहे, अशी टीका बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे संजय मेस्त्री यांनी केली. त्याचबरोबर महिलांसाठी सकाळी बदलापूर आणि टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) तर, सायंकाळी छशिमट ते बदलापूर आणि टिटवाळा, अशा विशेष लोकल सोडण्याची मागणी बासनात गुंडाळण्यात आली आहे. रेल्वेने महिलांच्या भावनांचा अनादर केला असल्याची टीका महिला प्रवाशांमधून होत आहे.
महिलांच्या प्रथम, द्वितीय श्रेणीचे डबे वाढवावेत. तसेच सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी ठाणे ते कसारा, कर्जत, टिटवाळा, बदलापूर लोकलफेऱ्यांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. गर्दीच्या वेळी सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांनी बदलापूर-छशिमटही ही धीमी लोकल सुटल्यानंतर दुसरी बदलापूरहून धीमी लोकल येथून १० वाजून २७ मिनिटांनी आहे. त्यानंतर, दुपारी २ वाजताची कर्जत ते ठाणे धीमी लोकल गेल्यानंतर थेट रात्री ८ वाजून ४ मिनिटांनी छशिमटसाठी धीमी लोकल आहे. बाकीच्या लोकल जलद आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे येथून छशिमट किंवा ठाणेदरम्यान धीमी लोकल वाढवण्याची गरज असल्याचे मेस्त्री म्हणाले.
छशिमटहून बदलापूर-कर्जतसाठी दुपारी १२.२२ ते दुपारी १.१३ दरम्यानच्या ५१ मिनिटांमध्ये, दुपारी ४.४५ ते सायंकाळी ५.२५ (३५ मिनिटे), सायंकाळी ७.५५ ते रात्री ८.४८ वाजेपर्यंत (सुमारे ५३ मिनिटे), तर कर्जत ते छशिमटकडे दुपारी २.१६ ते ३.२७ (७१ मिनिटे), सायंकाळी ६.४२ मिनिटे ते सायंकाळी ७.४५ मिनिटे (६३ मिनिटे), सायंकाळी ७.४५ ते रात्री ८.४० मिनिटे (५५ मिनिटे) अशा मोठ्या वेळांच्या कालावधीत लोकल सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
परळ, दादर, वांद्रे-कुर्ला परिसरात रुग्णालये, खाजगी कंपन्या बºयाच आहेत. दुपारनंतर कामावरून सुटणाºया कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दादर ते बदलापूरदरम्यान दुपारी ४.१३ वाजता सुटणाºया लोकलची वेळ बदलून ४.२५ अशी करावी, अशी मागणी रेल्वेकडे केली होती. ही लोकल दादरऐवजी छशिमट येथून ३.४८ वाजता सोडण्यात येते. ती दादर येथे दुपारी ४.०३ वाजता येते. पूर्वी ही लोकल दादरहून २.१३ वाजता सुटत होती. त्यामुळे त्या लोकलचा ४ वाजता सुटणाºया कर्मचाºयांना काहीच फायदा नाही. दादरहून कर्जत लोकल ४० मिनिटांनंतर दुपारी ४.४३ वाजता आहे. तसेच छशिमटहून दुपारी ३.४४ वाजता कर्जत लोकल आहे. लगेच चार मिनिटांनी दुपारी ३.४८ वाजता बदलापूर लोकल आहे.
‘गर्दीच्या वेळेत लेटमार्कचा बडगा शिथिल करा’
डोंबिवली : कार्यालयीन वेळेत पोहोचलो नाही तर लेटमार्क लागण्याच्या भीतीने गर्दीतून जीवघेणा प्रवास करतात. त्यामुळे विविध कार्यालयांमध्ये लेटमार्कचा हा बडगा शिथिल करण्याचे आवाहन युथ फाउंडेशनच्या अध्यक्ष कल्पना किरतकर यांनी केले आहे.
चार्मी पासड या २२ वर्षीय तरुणीचा कामावर जाताना लोकलच्या गर्दीमुळे मृत्यू झाला. त्यामुळे लेटमार्कची सततची टांगती तलवार न ठेवता सकाळी गर्दीच्या वेळेत हा नियम शिथिल करावा. तसेच उशीर झालेला वेळ वाढवून तो कालावधी भरून काढावा. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी कसरत टळून अनेक जीव वाचतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. रेल्वे प्रशासनाला कधी जाग येणार यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी बसपचे प्रदेश कोषाध्यक्ष दयानंद किरतकर यांनी स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली तरी रेल्वेची प्रगती झाली नसल्याची खंत व्यक्त केली.
रेल्वेच्या जलद आणि धीम्या गतीसाठी अद्याप दोनच मार्ग आहेत. रेल्वे मार्गाजवळच्या बहुतांशी जागा रेल्वेच्या मालकीच्या आहेत; मात्र त्या जागांवर अतिक्रमणे आहेत. ती हटवणे हे रेल्वेसमोर मोठे आव्हान आहे. मुंबईच्या जीवनवाहिनीतून प्रवास करणाºया मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची संख्या सुमारे ८५ लाख आहे. मुंबईतून येणाºया प्रवाशांच्या उत्पन्नाचा अर्धा हिस्सा देशाच्या संरक्षण निधीसाठी उपलब्ध केला जातो. पण, प्रवाशांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही प्रवाशांची शोकांतिका असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात काही दिवसांतच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.