आईवेड्या श्यामचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:14 AM2020-02-16T01:14:37+5:302020-02-16T01:15:53+5:30
‘श्यामची आई’ या पुस्तकाने जणू इतिहास घडवला
रामदास खरे
‘अरे श्याम... पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस. ती शेंडी पूस’, आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले. सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो तशी आई म्हणाली ‘ती दह्याची कोंढी घे. आत दही आहे ते चाटून टाक. तुला आवडते ना?’ तसा मी रडवेला होऊन आईला म्हणालो. ‘हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन?’ आईचे डोळे भरून आले. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. आईने जवळ घेतले आणि म्हणाली ‘श्याम ! तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. म्हणून मी त्याला मारले. श्याम! तुझ्या आईला ‘तुमची मुले भित्री आहेत’ असे कोणी म्हटले, तर ते तुला आवडेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? रागावू नकोस. चांगला धीट हो. ते दही खा आणि जा खेळ. आज निजू नकोस. पोहून आल्यावर निजेल तर लगेच सर्दी होते हो.’
‘श्यामची आई’ हे सानेगुरुजींचे आत्मचरित्र नाही तर ती एका मायलेकराची एक असामान्य गोष्ट आहे. श्यामची आई पुस्तक वाचलेच नाही, अशी व्यक्ती महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात सापडणे अवघड आहे. सोशिक, सोज्वळ, प्रेमळ मात्र प्रसंगी करारी आणि स्वाभिमानी स्त्री म्हणजे श्यामची आई. लहानग्या श्यामला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी, चांगला माणूस घडवण्यासाठी उत्तम संस्काराची शिदोरी देणारी श्यामची आई आपल्याला डोळ्यांसमोर दिसते. त्या घटनेला आता जवळजवळ ९० वर्षांचा काळ लोटला आहे. परमपूज्य सानेगुरुजींनी नाशिकच्या बंदिवासात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी आपल्या प्राणप्रिय आईच्या अनंत आठवणी एका वेगळ्याच मानसिकतेत लिहायला सुरुवात केली. अवघ्या पाच दिवसांत त्या साऱ्या आठवणी झपाटल्याप्रमाणे एकटाकी लिहिल्या. पुढे तीन वर्षांनी त्या लक्ष आठवांचे झाले एक सुंदर पुस्तकच. तो दिवस होता, १६ फेब्रुवारी १९३६ दासनवमी.
‘श्यामची आई’ या पुस्तकाने जणू इतिहास घडवला. १७ वर्षांनी आचार्य अत्रे यांनी या पुस्तकावर चक्क चित्रपट काढायचे ठरवले. चित्रपटाचे दिग्दर्शन, पटकथा, संवाद ही जबाबदारी खुद्द अत्रे साहेबांनी स्वत:कडे घेतली. चित्रपटात श्याम आणि श्यामची आई या व्यक्तिरेखा साकारणाºया अभिनेत्यांचा शोध अत्रेसाहेब घेऊ लागले. श्यामची आई ही महत्त्वाची आणि मध्यवर्ती व्यक्तिरेखा अभिनेत्री वनमालाबाई यांना देण्यात आली. आणि...आणि... आईवेड्या लहानग्या श्यामची भूमिका कोण करणार? ती भूमिका अगदी सहजपणे चालून आली ती माधव वझे या बोलक्या डोळ्यांच्या चुणचुणीत मुलाकडे. वनमालाबाई आणि माधव वझे यांनी आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला, त्या भूमिका अजरामर झाल्या. श्याम म्हणजेच माधव वझे असे समीकरणच तयार झाले. अखेर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होऊन ६ मार्च १९५३ रोजी गिरगावच्या कृष्णा टॉकीज (म्हणजे आताचे ड्रीमलॅण्ड थिएटर) इथे चित्रपटाचा पहिला शो मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपट आणि सर्व गाणीदेखील तितकीच गाजली. आठवतंय का ? छडी लागे छम छम...विद्या येई घम घम, हे कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेले पहिले गाणे आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले पहिले गाणे. आहे ना सुंदर योगायोग. त्याचप्रमाणे ‘भरजरी गं पितांबर दिला फाडून...’ हे गाणे खुद्द अत्रे साहेबांनी लिहिलेले आणि चित्रपटाच्या शेवटी कविश्रेष्ठ यशवंत यांनी समर्पक, आर्त शब्दांत लिहिलेले गाणे ‘आई म्हणोनी कोणी’, ही तीनही गाणी विलक्षण गाजली.
या चित्रपटात श्यामची प्रमुख भूमिका करणारा बालकलाकार माधव वझे एका रात्रीत लोकप्रिय झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा माधव वझे यांचे वय होते अवघे १४ वर्षे. परंतु त्यांची त्यावेळची अभिनयातील समज वाखाणण्यासारखी होती. माधव वझे यांचे आज वय ८१ वर्षे इतके आहे. ते सध्या पुण्यात राहतात. ‘श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. आपल्या मनोगतात ते म्हणतात. ‘श्यामची आई या चित्रपटाच्या निमित्ताने मी तुमच्या (म्हणजे अत्रे साहेबांच्या) सहवासात आलो आणि तिथे सगळे म्हणत होते, त्याप्रमाणे मीही तुम्हाला साहेब म्हणायला लागलो. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आणि त्यानंतरच्या वर्ष-सहा महिन्यांच्या काळातले साहेब किती लोभस होते, हे फक्त माझं मलाच माहीत आहे. अत्र्यांनी तुला काय दिलं ? म्हणजे किती पैसे वगैरे-असा प्रश्न विचारणारे विचारतातच. तेव्हा क्षणभराचाही विचार न करता मी सांगतो. आचार्य अत्रे यांनी मला माधव वझे ही ओळख दिली !’
‘श्यामची आई’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेले माधव वझे हे उत्तम नट आहेत आणि त्यांचा रंगभूमीचा अभ्यासदेखील दांडगा आहे. पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. नाटककार परशुराम देशपांडे यांनी शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे मराठीत रूपांतर केले होते. त्याचे दिग्दर्शन माधव वझे यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या केले. माधव वझे यांना बालपणापासूनच वाचनाची प्रचंड हौस. घरात उत्तमोत्तम लेखकांचे विचारधन, शब्दकोशाची पुस्तके होती. त्यांचे वडील नूतन मराठी विद्यालयात इंग्रजी व संस्कृत विषयाचे शिक्षक होते. उत्तम ग्रंथांच्या सहवासामुळे व वाचनामुळे आपली जीवनाकडे बघण्याची दृष्टी प्रगल्भ झाली असे ते नमूद करतात.
इंग्रजीतले रायडर्स टू सी यापासून थेट राम गणेश गडकरी यांनी साकारलेली नाटकांची पुस्तके त्यांनी झपाट्याने वाचली. तर पुढे बी.ए इंग्रजी अभ्यासक्रमात शेक्सपियरचे साहित्य समाविष्ट असल्याने शेक्सपियरची नाटके, साहित्य वाचनाने, अभ्यासाने ते समृद्ध झाले. आपल्या स्वत:च्या मुंजीत त्यांना चक्क ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या सहा प्रती सस्नेह भेट म्हणून मिळाल्या होत्या. माधव वझे म्हणतात की, ‘श्यामची आई’ हे पुस्तक खरे तर लहानांसाठी नसून मोठ्यांसाठी म्हणजेच पालकांसाठी आहे. पुढे नाटकाच्या ओढीने ते अभिनय क्षेत्रात आले. बा.सी. मर्ढेकर, भालचंद्र नेमाडे, चिं.त्र्यं. खानोलकर हे लेखक माधव वझे यांच्या विशेष आवडीचे. वाचक रसिकांनो तुम्हाला आठवतंय का? अमीर खानच्या गाजलेल्या ‘थ्री इडियट’ या चित्रपटात त्यांनी भूमिकादेखील केली आहे हे विशेष. अमीरबरोबर काम करताना बरेच काही शिकता आले असे ते आवर्जून सांगतात. नाट्य-चित्रपट या विषयावर माधव वझे यांनी वृत्तपत्रातून, मासिकातून विपुल लेखन केले आहे.
‘श्यामची आई’ हा चित्रपट जेव्हा प्रकाशित झाला, तेव्हा माझा तर जन्मही झाला नव्हता. परंतु नंतर शालेय आणि कॉलेज जीवनात या चित्रपटाची मी अनेकवेळा पारायणं केली होती. सर्वांच्या लाडक्या श्यामचे हस्ताक्षरपत्र माझ्या संग्रही आहे, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. दि. १५ जुलै २००३ या पत्रातून माधव वझे संवाद साधतात. ‘स्त्री मासिकामधील माझा लेख आवडल्याचे आवर्जून कळविल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! घराचे घरपण, कुटुंबीयांनी एकमेकांशी वेळोवेळी गप्पागोष्टी करीत राहिल्याने व वेळोवेळी आपापली मने एकमेकांसमोर स्वच्छ करीत गेल्यानेच सांभाळले जाईल असे मला वाटते. एकमेकांचा एकमेकांना आधार वाटावा व तसा धाकही वाटावा... म्हणजे हातून काही अनुचित, अशुद्ध, अयोग्य घडण्याची शक्यता कमी होत जाईल. आपल्या दोन मुलींचे आयुष्य यामधूनच आकारास येईल व तसे ते येवो ! आपण सर्वांना शुभेच्छा!’
‘श्यामची आई’ चित्रपटाला आता ७० वर्षांचा काळ लोटला आहे. आजचा श्याम तितका भाबडा राहिलेला नाही. तो स्मार्ट आहे. त्याच्या पुढे अनंत आव्हाने आहेत आणि त्याची आई? ती तर करिअर करणारी आणि अनेक पातळ्यांवर लढणारी स्त्री झाली आहे. आजचा श्याम घडवताना त्या माऊलीला हीच संस्कार शिदोरी द्यावी लागणार आहे.
मातृप्रेमाचा महन्मंगल साहित्यठेवा म्हणजेच श्यामची आई हे पुस्तक. विविध भाषांमध्ये त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, अजूनही निघत आहेत. या पुस्तकाने जणू इतिहास घडवला. या पुस्तकाने आचार्य अत्रे तर पुरते भारावून गेले. सतरा वर्षांनी त्यांनी या पुस्तकावर चित्रपट काढला. या चित्रपटात श्यामची भूमिकेसाठी आईवेडा श्याम म्हणून निवड झाली ती माधव वझे यांची. तेव्हा अवघ्या १४ वर्षांचे असलेले माधव या भूमिकेमुळे एका रात्रीत प्रसिद्ध झाले. आज त्यांचे वय ८१ वर्षे असून ते पुण्यात राहतात. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना भावलेले, त्यांनी पाहिलेले आचार्य अत्रे या अनुभवावरून त्यांनी लिहिलेले ‘श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. याचबरोबर ‘रंगमुद्रा’, ‘प्रायोगिक रंगभूमी-तीन अंक’ ही पुस्तके आणि इतरही विपुल लेखन त्यांनी केलेले आहे. याच श्यामचे पत्र माझ्या संग्रही आहे.