उपोषणकर्त्या कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना पत्र, कारागृह प्रशासनाची हतबलता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 08:47 PM2017-09-19T20:47:28+5:302017-09-19T20:47:46+5:30
न्यायालयात उपोषण करीत कारागृह यंत्रणेला वेठीस धरणाºया हरिश्चंद्र शुक्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्रच आता ठाणेनगर पोलिसांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिले आहे.
ठाणे, दि. 19 : न्यायालयात उपोषण करीत कारागृह यंत्रणेला वेठीस धरणाºया हरिश्चंद्र शुक्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्रच आता ठाणेनगर पोलिसांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिले आहे. आता यावर विधी तज्ज्ञांशी चर्चा करूनच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन न मिळाल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या या कैद्याने जामीन मिळावा आणि आपल्यावर आरोप काढण्यात यावेत, या कारणांसाठी न्यायालय आणि पोलिसांच्या विरोधात ठाणे मध्यवर्ती कारागृहातच उपोषण सुरू केले आहे. दोन वेगवेगळ्या यंत्रणांविरुद्ध कैद्याचे हे आंदोलन असले तरी कारागृह यंत्रणा यात नाहक भरडली जात आहे. त्यामुळे शुक्लाला वेगळ्या बराकी हलवून त्याच्यावर सतत लक्ष ठेवून वारंवार डॉक्टरांकडून त्याची तपासणी करावी लागत आहे.
शिवाय, त्याच्या प्रकृतीची माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायालय, मुंबईतील कारागृह मुख्यालयासह अनेक ठिकाणी देण्यातही कारागृह प्रशासनाचा वेळ खर्ची पडत आहे. कारागृहात त्याचे उपोषण सुरू असले तरी कारागृह प्रशासनाकडून कोणतीही निर्णायक भूमिका घेतली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही तसेच कारवाई करण्याचे पत्रच कारागृह अधीक्षक नितिन वायचळ यांनी ठाणेनगर पोलिसांना दिले आहे. या पत्रावर विधी तज्ज्ञांची चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले. सध्या तरी वैद्यकीय अधिका-यांच्या निगराणीखाली या कैद्याचे उपोषण सुरू असून त्याला कुटूंबियांची भेट घेणे आणि न्यायालयातील सुनावणीही नाकारण्यात आली आहे.