रत्नाकर मतकरी यांनी मला पाठवलेले पत्र आज डोळ्यांसमोर आले : रामदास खरे यांनी सांगितल्या आठवणी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 18, 2020 03:01 PM2020-05-18T15:01:26+5:302020-05-18T15:01:26+5:30

रत्नाकर मतकरी याना रामदास खरे यांनी पत्र लिहिले होते.

The letter sent to me by Ratnakar Matkari came to my notice today: Memories shared by Ramdas Khare | रत्नाकर मतकरी यांनी मला पाठवलेले पत्र आज डोळ्यांसमोर आले : रामदास खरे यांनी सांगितल्या आठवणी

रत्नाकर मतकरी यांनी मला पाठवलेले पत्र आज डोळ्यांसमोर आले : रामदास खरे यांनी सांगितल्या आठवणी

Next
ठळक मुद्देमतकरी यांनी विस्तृत पत्र लिहिले होते : खरे

ठाणे : ज्येष्ठ नाटककार, लेखक रत्नाकर मतकरी यांचे प्रकाशित झालेले संदेह हे पुस्तक वाचनात आल्यावर मी त्याचा अभिप्राय पाठवला होता. तसेच त्याचे नुकतेच प्रदर्शित झालेले बकासुर हे नाटक आमच्या ठाण्यात कधी येणार अशी विचारणा केली होती. त्यावर त्यांनी विस्तृत असे उत्तर पत्राने दिले होते. ते पत्र आज डोळ्यासमोर पुन्हा उभे राहिले आणि माझे मत अलगद भूतकाळात रमू लागले अशा भावना ठाण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक रामदास खरे यांनी व्यक्त केल्या.     

खरे त्यांच्या आठवणी सांगताना म्हणाले की,  माझ्यापाशी रत्नाकर मतकरी यांचे दि २ सप्टेंबर १९९८ चे एक दुर्मिळ पत्र आहे. रत्नाकर मतकरींच्या अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. कथा, कादंबरी, एकांकिका, दीर्घांक, दूरदर्शन मालिका, नाटक, चित्रपट अशा सर्व माध्यमांवर जबरदस्त हुकूमत असणारे आणि बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, आणि  व्यावसायिक रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करणारे प्रयोगशील नाटककार, गूढकथाकार, कादंबरीकार रत्नाकर मतकरी यांची चटका लावणारी एग्झिट मन व्याकुळ करून गेली. सर्वात महत्वाचे म्हणजे मतकरींनी लेखनाबरोबरच सामाजिक बांधिलकी प्राणपणाने जपली, वाढवली. 'वंचितांच्या रंगमंचाचे ते प्रणेते होते. ठाण्यामध्ये या रंगमंचाच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमास मतकरी सर आवर्जून उपस्थित राहत आणि मार्गदर्शन करीत.  साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते माजी विश्वस्त होते. १९५५ मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांची 'वेडी माणसं' ही पहिलीवहिली एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून प्रसारित झाली आणि त्यानंतर अगदी कालपर्यंत अखंडपणे त्यांचे लेखन,वाचन सतत सुरूच होते. लोककथा-७८ या नाटकाने तर इतिहास घडवला. पुढे दुभंग, अश्वमेघ, खोल खोल पाणी, जावई माझा भला, घर तिघांचं हवं, माझं काय चुकलं ?, आणि अलीकडचे आरण्यक व  इंदिरा या नाटकांनी नाट्यरसिकांच्या मनामध्ये तर खास घर केले होते . खास मुलांसाठी अलबत्या गलबत्या आणि निम्मा शिम्मा राक्षस तर सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालीत आहेत. कादंबरी लेखनाबरोबरच खास मतकरी शैलीत त्यांनी साकारलेल्या गूढ कथा म्हणजे वाचक रसिकांसाठी मोठी पर्वणीच. ३० ते ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या गूढकथा अजूनही वाचकांना चकवा देतात. मतकरींची वाङ्मयसंपदा समृद्ध आहे. मोठ्यासाठी ७० तर मुलांसाठी २२ नाटके त्यांनी लिहिली. २० कथा संग्रह, तीन कादंबऱ्या, १२ ललित लेख संग्रह, आणि 'माझे रंगप्रयोग' हा आत्मचरित्रामक ग्रंथ. गहिरे पाणी, अश्वमेघ, बेरीज वजाबाकी या दूरदर्शन मालिका, इन्व्हेस्टमेंट सारखा आशय घन चित्रपट असे बरेच लेखन,  प्रयोग ते सतत न थकता करीत होते. आत्तापर्यंत मतकरी सरांना विविध संस्थांचे, शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. गेले वर्षभरात मतकरी सरांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनेकवेळा छानसा योग आला. अधोरेखित-२०१९  या दिवाळी अंकाचे प्रकाशन आम्ही मागील वर्षी त्यांच्या दादरच्या निवासस्थानी केले, तेव्हा त्यांच्याशी मारलेल्या गप्पा या सदैव आठवणीत राहतील अशा. अनेक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने विविध ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधता आला.

Web Title: The letter sent to me by Ratnakar Matkari came to my notice today: Memories shared by Ramdas Khare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.