उपराष्ट्रपतींकडून ‘त्या’ बांधकामाची दखल, मुख्य सचिवांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:51 PM2017-12-24T23:51:18+5:302017-12-24T23:51:39+5:30
केडीएमसीने आरक्षित जागेत ‘ई’ प्रभागाचे कार्यालय थाटल्याच्या तक्रारीची दखल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे.
डोंबिवली : केडीएमसीने आरक्षित जागेत ‘ई’ प्रभागाचे कार्यालय थाटल्याच्या तक्रारीची दखल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे. यासंदर्भात नायडू यांचे अवर सचिव हुरबी शकील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून या प्रकरणाची दखल घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराला द्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
दावडी परिसरातील रिजन्सी गार्डन संकुलातील प्रशस्त जागेत ‘ई’ प्रभागाचे कार्यालय थाटण्यात आले आहे. १२ फेब्रुवारीला या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. परंतु, ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केल्याने शुभारंभाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. स्थानिक रहिवासी विश्वनाथ पटवर्धन यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोसायटीने तत्कालीन महापालिका आयुक्त ई. रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह अन्य काही जणांना कायदेशीर नोटिसाही बजावल्या आहेत.
केडीएमसीच्या नगररचना विभागाने मंजुरी दिल्याप्रमाणे ही जागा दवाखाना व बालवाडी, यासाठी आरक्षित होती, याकडे पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. या आरक्षित जागेवर ‘ई’ प्रभाग कार्यालय थाटणे म्हणजे एक प्रकारे महापालिकेकडूनच अतिक्रमण झाल्यासारखे आहे. पटवर्धन यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या तपशिलात जेथे हे कार्यालय उभारले आहे, ती जागा अॅमेनिटी स्पेस म्हणून दवाखाना आणि बालवाडी, यासाठी आरक्षित असल्याचेही समोर आले आहे. या क्षेत्राचा वापर हा स्थानिक तसेच संकुलातील रहिवाशांनी करावयाचा आहे.