भिवंडीत १८ वेठबिगार कामगारांची मुक्तता; मालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:52+5:302021-08-28T04:44:52+5:30
भिवंडी : तालुक्यातील पिलंझे गावातील वीटभट्टी मालकांकडून स्थानिक आदिवासी मजुरांवर अमानुष अत्याचार करून तुटपुंज्या मजुरीवर काम करण्यास भाग पाडले ...
भिवंडी : तालुक्यातील पिलंझे गावातील वीटभट्टी मालकांकडून स्थानिक आदिवासी मजुरांवर अमानुष अत्याचार करून तुटपुंज्या मजुरीवर काम करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारीनंतर तब्बल १८ वेठबिगार मजुरांची मालकाच्या बंधनातून गुरुवारी मुक्तता करण्यात आली. यासंदर्भांतील बंधमुक्तीचे प्रमाणपत्र या अठरा मजुरांना भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांनी सुपूर्द केले. श्रमजीवी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर यावेळी उपस्थित होते.
पिलंझे येथील राजाराम पाटील व चंद्रकांत पाटील हे शासकीय कामांचे ठेकेदार असून त्यांच्या मालकीच्या वीटभट्टी व दगडखाणी असून पिलंझे बुचिचापाडा या आदिवासी, कातकरी वस्तीतील मजूर तेथे कामावर जात. दोन्ही ठेकेदारांकडून या मजुरांवर अमानुष अत्याचार करून तुटपुंज्या मजुरीवर काम करण्यास भाग पाडले जात होते. त्यास विरोध करणाऱ्यांना मारझोड करून वेठबिगाराप्रमाणे राबवून घेतले जात होते. आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांना दोन महिन्यांपूर्वी याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी या गावात जाऊन चौकशी केली असताना या मजुरांची व्यथा उघड झाली होती. त्यानंतर भिवंडी तहसीलदार कार्यालयात सतत तीन दिवस श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून हे वेठबिगारी प्रकरण लावून धरल्यानंतर या मजुरांचे जाबजबाब नोंदवून त्यांना वेठबिगरीच्या पाशातून मुक्त करण्यात आल्याचे प्रमाणपत्र तहसीलदार अधिक पाटील यांनी प्रदान केले.
दरम्यान, ठेकेदार राजाराम पाटील यांनी त्यांच्या घरी मजुरी करणाऱ्या महिलेवर बलात्कार केला असून एका मजुराच्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक लगट केल्याबद्दल गणेशपुरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. दोन्ही मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कोलेकर यांनी केली.
...........
वाचली