मुंब्रावासीयांची वाहतूक कोंडीतून मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:55+5:302021-03-07T04:36:55+5:30
मुंब्रा : अनेक वर्षांपासून मुंब्य्रात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येथील कौसा ते तन्वरनगर ...
मुंब्रा : अनेक वर्षांपासून मुंब्य्रात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येथील कौसा ते तन्वरनगर दरम्यान रुंदीकरणाआड येणारे अडथळे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण यांनी दूर केले आहेत. त्यामुळे या पट्ट्यातील रखडलेले रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून, आता येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे.
येथील रस्त्यालगतची दुकाने, विद्युत ट्रान्स्फार्मर, भूमिगत वीज, मलनिस्सारण वाहिन्या यामुळे येथे अनेक ठिकाणी रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू होते. याला गती मिळावी यासाठी पठाण यांनी विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हाती घेताच महावितरण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रुंदीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रुंदीकरणाच्या आड येणारे अडथळे दूर करून या रस्त्याचे काम जलदगतीने सुरू केले आहे. महत्त्वाचे म्हणजे कामादरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये. यासाठी कामे रात्रीची करण्यात येत आहेत.