कोरोनामुळे खंडित झालेली ग्रंथयान सेवा पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:00+5:302021-03-04T05:16:00+5:30
ठाणे : कोरोनामुळे एक वर्षापासून बंद असलेली व वाचक जिची आतुरतेने वाट बघत होते त्या ‘ग्रंथयान’ या फिरत्या लायब्ररीची ...
ठाणे : कोरोनामुळे एक वर्षापासून बंद असलेली व वाचक जिची आतुरतेने वाट बघत होते त्या ‘ग्रंथयान’ या फिरत्या लायब्ररीची भ्रमंती ठाण्यात मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांनी राबवलेला हा प्रकल्प ठाणेकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा बनला आहे. वाढत्या पसार्यामुळे ठाणे शहराच्या कक्षा खूप रुंदावल्या आहेत. दूरदूच्या वाचकांना ग्रंथालय सेवा त्यांच्या भागात जाऊन देण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांनी ही फिरती लायब्ररी पाच वर्षांपूर्वी सुरू केली. तिला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मराठी राजभाषा दिनाचा शुभ दिनी ग्रंथयान पुन्हा कार्यरत झाले आहे. या उपक्रमाची ओळख जनतेला करून देण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे फिरते वाचनालय (ग्रंथयान) उभे असते. सध्याच्या, घरात सुरक्षित राहण्याच्या काळात या सेवेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
- ठाण्यात ३० ठिकाणी थांबे
ठाणे शहराबाहेरील ३० ठिकाणी ग्रंथयान थांबे आहेत. ऋतू इस्टेट, हिरानंदानी, शिवाईनगर, लोढा कॉम्प्लेक्स, ओझॉन व्हॅली, मेंटल हॉस्पिटल, हरिओमनगर, मनिषानगर, लुईसवाडी अशा विविध भागांतून तेथील जवळपासच्या वाचकांना पुस्तके बदलून घेण्याची सोय होणार आहे.