सांस्कृतिक नगरीतील वाचनालयांना घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:07 AM2019-07-07T00:07:12+5:302019-07-07T00:07:16+5:30
वाचकसंख्या टिकवण्याचे आव्हान : डोंबिवलीत २८ वर्षांमध्ये १२२ ग्रंथालये बंद
- जान्हवी मोर्ये।
डोंबिवली : तरुण पिढी सोशल मीडिया, टीव्ही, आॅनलाइन गेम यासारख्या माध्यमांना पसंती देत आहे. तसेच त्यांना तंत्रज्ञान, विज्ञान याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने वाचनाचा ट्रेण्ड बदलत आहे. या पार्श्वभूमीवर वाचनालयांना वाचकसंख्या टिकवणे महाकठीण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून ९० च्या दशकात अस्तित्वात असलेल्या १३६ वाचनालयांपैकी डोंबिवलीत केवळ १४ वाचनालये उरली आहेत. त्यातील ‘आवड वाचनालय’ हेही लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे.
वाचकांची वाचनरुची काळानुसार बदलत आहे. त्यामुळे वाचकसंख्या टिकवण्यासाठी नवी पुस्तके खरेदी करावी लागतात. त्यासाठी वाचनालयातील जागा अपुरी पडते. आम्ही एकाच वेळी तीन पुस्तके देतो. आईवडिलांनी सदस्यत्व स्वीकारले तर बालविभागातील एक पुस्तक लहानग्यांना मोफत देऊ न काही प्रमाणात अपुऱ्या जागेच्या समस्येवर मात करत आहोत, असे डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा म्हणाले. सभासद स्वत: पुस्तक निवडू शकतात. ‘लेखक आपल्या भेटीला’ यासारख्या कार्यक्रमांतून विविध लेखकांच्या पुस्तकांचा परिचय वाचकांना करून देतो. घरपोच सेवाही आम्ही देत होतो, मात्र अपुºया मनुष्यबळामुळे ती बंद केली. आमच्या वाचनालयाला नवीन जागा मिळावी, ही आमची मुख्य मागणी आहे. तरुणांना हवी असलेली पुस्तके उपलब्ध न झाल्यास ती ई-बुक्सकडे वळतात, असेही त्यांनी सांगितले.
प्र. के. अत्रे वाचनालयाच्या व्यवस्थापनाने तरुणाई ई-बुक्सकडे वळत असल्याने वाचनालयातील वाचकांची संख्या कमी होत आहे. आमच्या वाचनालयाचा उद्देश नफा कमावणे नसून वाचनाची आवड निर्माण करणे, हा आहे. त्यामुळे वाचक वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. वाचकांना नवीन पुस्तके हवी असतात. पण, नवीन पुस्तके खरेदी करताना त्यांच्या किमती आणि वाचनालयाची फी यांचा ताळमेळ घालणे वाचनालयांना कठीण होते. गणेश मंदिर संस्थान हे वाचनालय एक मिशन म्हणून चालवत आहे. १२०० दिवाळी अंक , बालविभागासाठी नवनवीन गोष्टींची पुस्तके या माध्यमातून वाचकांची आवड जपण्याचा प्रयत्न करत आहोत. वाचनालयात पुस्तके आणून काम संपत नाही. त्यांची पाने फाटली, तर बायंडिंग आणि वाळवी लागू नये म्हणून दक्षता घ्यावी लागते.
‘आवड’चे दत्तात्रेय नेरूरकर म्हणाले की, लोकांमध्ये पूर्वी वाचनाची आवड होती. ललित लेखन हा साहित्य प्रकार मोठ्या प्रमाणावर वाचला जायचा. त्यावेळी ४०० च्या आसपास वाचक होते. आता घरातील वडीलधारी मंडळी वाचत नसल्याने मुलेही वाचत नाही. आता वाचकांची संख्या ३५ वर गेली आहे. त्यातील १५ वाचक नियमित येतात. इंग्रजी माध्यमामुळे मुले मराठी पुस्तके वाचत नाहीत. त्यामुळे हे वाचनालय आता बंद करत आहे.
वाचनालयांनी काळानुरूप बदलले पाहिजे : पुंडलिक पै
पै फे्रण्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै म्हणाले की, वाचकसंख्या कमी झालेली नाही. वाचनालयाची वेळ वाचकांना जमत नाही. नवीन पुस्तके आणली नाहीत, तर लोकांना माध्यमे खूप आहेत. या व्यवसायात रिटर्न कमी असल्याने नवीन पिढी उतरत नाही. नवीन पिढीला फेसबुक, टीव्ही अशी विविध माध्यमे आहेत. आपण अजून सहा वाचनालये सुरू करत आहोत. वाचकांना घरपोच सेवा देतो. वाचकांना ज्या सोयीसुविधा हव्या आहेत, त्या दिल्या गेल्या पाहिजेत, तरच वाचक वाढतील. वाचनालये काळानुरूप न बदलल्यामुळे ती बंद पडलीत, असे वाटते.