अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक
By पंकज पाटील | Published: April 25, 2023 06:23 PM2023-04-25T18:23:10+5:302023-04-25T18:23:38+5:30
अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्याचा स्थानिकांचा आरोप
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्यामुळे अभ्यासिका पूर्णपणे भस्मसात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अंबरनाथ पूर्वेतील कानसई दत्त मंदिर परिसरात मनोहर कला सांस्कृतिक केंद्राच्या आवारात ही अभ्यासिका होती. या अभ्यासिकेत परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले आणि विद्यार्थी येऊन अभ्यास करायचे. या अभ्यासिकेला रविवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली. यावेळी स्थानिकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला, मात्र अग्निशमन दलाची गाडी उशिरा आली आणि तोपर्यंत संपूर्ण अभ्यासिका आगीत जळून खाक झाली.
अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन केंद्र अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरात आहे. हा भाग शहराच्या एका टोकाला असून तिथून अंबरनाथ पूर्वेत कुठेही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तासाचा अवधी लागतो. त्यामुळे अशा आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप कानसई परिसरातील स्थानिक रहिवासी आणि भाजपचे पदाधिकारी संजय आदक यांनी केला आहे. याबाबत त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे ही तक्रार केली असून त्यानुसार लवकरच शिवमंदिर परिसरातील मैदानावर अग्निशमन दलासाठी तात्पुरता शेड उभारून उपकेंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना दिल्याची माहिती आदक यांनी दिली आहे.