परवाना हातपाटीचा, मात्र उत्खनन सक्शनने

By admin | Published: January 9, 2016 11:37 PM2016-01-09T23:37:54+5:302016-01-09T23:37:54+5:30

कुंडलिका आणि कांडणे खाडीमध्ये अवैध सक्शन पंपाच्या साहाय्याने रेतीचे उत्खनन पुन्हा सुरू झाले आहे. यासाठी कुंडलिका खाडीत ११३ तर कांडणे खाडीत २६ सक्शन पंप कार्यरत आहेत.

Licensed handmade, but excavator suction | परवाना हातपाटीचा, मात्र उत्खनन सक्शनने

परवाना हातपाटीचा, मात्र उत्खनन सक्शनने

Next

- मिलिंद अष्टीवकर,  रोहा
कुंडलिका आणि कांडणे खाडीमध्ये अवैध सक्शन पंपाच्या साहाय्याने रेतीचे उत्खनन पुन्हा सुरू झाले आहे. यासाठी कुंडलिका खाडीत ११३ तर कांडणे खाडीत २६ सक्शन पंप कार्यरत आहेत. खाडीतून हातपाटीने रेती काढण्याचा परवाना मिळवून सक्शन पंपच्या साहाय्याने अवैधरीत्या रेती उत्खनन केले जात आहे. चार महिन्यांसाठी ७०० ब्रास रेतीचा महसूल भरून गुरुवारच्या एका रात्रीतच १०० ब्रासहून अधिक रेतीचे उत्खनन करण्यात आल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. खाडीतील सक्शन पंप जप्तीची कारवाई तहसीलदार कधी करणार, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.
तालुक्यात हातपाटीद्वारे रेती उत्खनन करण्यास जिल्हा महसूल शाखेने परवाने दिले आहेत. त्याचबरोबरच डुबकी मारून वाळूचे उत्खनन करण्यासही परवानगी आहे. कुंडलिका आणि भालगाव खाडीत हातपाटीने रेती उत्खननाचा परवाना घेऊन त्याऐवजी सक्शन पंप, होड्या आदी यंत्रणेच्या साहाय्याने रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आले आहे. गुरुवारी रोह्याची आमसभा अर्धवट सोडून काही स्थानिक पुढाऱ्यांनी खाडीलगत जाऊन यासाठीचे क्षेत्रफळ वाढविले आणि एका रात्रीतच सुमारे १०० ब्रासहून अधिक रेतीचे उत्खनन केले. रेतीची वाहतूकही रात्रभर सुरू होती. मुंबई, पुणे आदी ठिकाणी येथून रेती जाते. शहरातही सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी शुक्रवारी पहाटे वाळूचे साठे केलेले दिसून आले.
खारापाटी ते न्हावे आणि विशेष करून सानेगाव, यशवंतखार, करंजवीरा या गावालगतच्या खाडीतून रेती उत्खनन केले गेले आहे. महसूल प्रशासनाने चार महिन्यांच्या दीर्घ मुदतीत ७०० ब्रास रेती डुबकी मारून काढण्यासाठीचे परवाने दिले आहेत. प्रत्यक्षात दोन्ही खाड्यांमध्ये १४० हून अधिक सक्शन पंप रेती उत्खनन करीत आहेत. डुबकी मारून एका परमिटला एक होडीप्रमाणे दिवसभरात केवळ तीन ब्रास रेती काढणे हे शासकीय गणित सक्शन पंपामुळे मोडीत निघत आहे. दिवसाला एक सक्शन पंप आणि होडीच्या साहाय्याने साधारण २० ब्रास रेती काढली जाते. रात्री ही संख्या दुप्पट असते. गुरुवारी रात्रीत १४० पैकी निम्मे जरी सक्शन पंप वापरले गेल्यास किती महसुल बुडाला असेल याची आकडेवारी समोर येते.

महसूल प्रशासन रेती वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करते. रोहा तहसीलदार ऊर्मिला पाटील यांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल केले जातील, असे सांगितले होते. मात्र केवळ दंडात्मक कारवाई करून महसूल जमा करण्याचे टार्गेट महसूल प्रशासन पूर्ण करताना दिसून आले आहे. खोट्या पावत्या छापण्याची शक्कल काहींनी लढवल्याने ही कारवाईही बंद होणार आहे.

Web Title: Licensed handmade, but excavator suction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.