परवाने, मोबाईल टॉवर्स, हॉकर्स पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत; उल्हासनगर महापालिकेला मिळणार पर्यायी स्रोतातून ५० कोटीचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 06:50 PM2021-09-26T18:50:03+5:302021-09-26T18:51:23+5:30
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महापालिकेची आर्थिकस्थिती आमदानी अठ्ठनी खर्चा रुपया अशी झाली असतांना, आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका मालमत्ता व पाणीपट्टी कर व शासनाचे एलबीटी अनुदान या मुख्य उत्पन्न स्रोता व्यतिरिक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्यासह अन्य सहकारी अधिकाऱ्यांनी पर्यायी उत्पनाचे स्रोत निर्माण केले. या पर्यायी उत्पन्न स्रोतातून दरवर्षी ५० कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली असून आयुक्त दयानिधी यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
उल्हासनगर महापालिकेची आर्थिकस्थिती आमदानी अठ्ठनी खर्चा रुपया अशी झाली असतांना, आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले. या स्रोतातून दरवर्षी महापालिकेला ५० कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी व्यक्त केली. सोमवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत शहरातील नोंदणीकृत ६५० पेक्षा जास्त फेरीवाल्यांकडून शुल्क आकारण्याचा ठराव आला असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
टोपलीतून भाजी विकणाऱ्या फेरीवाल्याकडून दिवसाला १० तर मोठया फेरीवाल्याकडून दिवसाला ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच विविध मोबाईल कंपनीला, त्यांचे मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी महापालिका जागा व परवानगी देणार आहे. त्याबदल्यात दरमहा भाडे आकारणार असल्याने, लाखोंचे उत्पन्न पालिकेला मिळण्याची शक्यता आहे.
शहारतील दुकानदार व वाणिज्य व्यवसाय करणाऱयांना परवाने देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र आज पर्यंत याकडे दुर्लक्ष झाल्याने, महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडीत निघाले. ४० हजारा पेक्षा दुकाने, कारखाने व इतर वाणिज्य व्यापाऱ्यांची संख्या शहरात असून यांना दरवर्षी नुतनीकरण करून परवाने द्यावे लागणार आहे.
प्रत्येक परवान्याची ५ हजार फी आकारल्यास, ४० कोटी पेक्षा जास्त उत्पन्न एकट्या परवान्यातून मिळण्याची शक्यता उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी व्यक्त केली. याव्यतिरिक भाजी मंडई भाडे, अग्निशमन दलाच्या ना हरकत परवाना, मालमत्तेचे भाडे, शहरात जाहिरात धोरण राबविल्यास यापासून महापालिकेला वर्षाला कोटीचे उत्पन्न मिळणार असून महापालिकेने विविध उपाययोजना आखण्यास सुरवात केल्याचे संकेत उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली.
मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत?
महापालिकेने शहारतील मालमत्तेच्या सर्वेक्षण व मॅपिंगचे काम खाजगी कंपनीला दिले असून ७० टक्के काम केल्याचा दावा कंपनीने केला. तसेच सर्वेक्षण व मॅपिंग पूर्ण झाल्यास महापालिकेला दरवर्षी ५० ते ६० कोटीचे उत्पन्न वाढण्यासाची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या इतिहासात उत्पन्नाच्या मुख्य स्रोता व्यतिरिक्त पर्यायी उत्पन्न म्हापालिकेचे वाढणार असल्याने, आयुक्तसह सहकारी अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.