अंबरनाथ-बदलापूरच्या नागरिकांचा विश्वास जीवन प्राधिकरणाने गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:53 PM2019-11-17T22:53:56+5:302019-11-17T22:54:07+5:30

पाणीपुरवठ्याचे काम करणारी आणि वितरणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरण काम करत असले तरी अंबरनाथमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

Life authority lost the trust of citizens of Ambarnath-Badlapur | अंबरनाथ-बदलापूरच्या नागरिकांचा विश्वास जीवन प्राधिकरणाने गमावला

अंबरनाथ-बदलापूरच्या नागरिकांचा विश्वास जीवन प्राधिकरणाने गमावला

Next

- पंकज पाटील, अंबरनाथ

उल्हास नदीच्या तीरावर वसलेल्या अंबरनाथ तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. केवळ उल्हास नदी नव्हे तर बारवी धरणातूनही पाणी उपलब्ध होईल, अशी यंत्रणा असतानाही अंबरनाथ आणि बदलापूरला पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांच्या तक्रारी कमी करण्याची जबाबदारी ज्या जीवन प्राधिकरणावर आहे, तेच प्राधिकरण आता शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरवासीयांची विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरण हटाव शहर बचाव, अशी मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या काही वर्षांत जीवन प्राधिकरणाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरसाठी सरकारने नगरोत्थान योजनेतूनच सर्वात आधी भरीव निधीची तरतूद केली. या निधीतून शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था सुधारण्याचा प्रस्ताव होता. अर्थात त्या अनुषंगाने कामेही झाली. अनेक ठिकाणी जलकुंभ उभारले तर काही ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र एवढे केल्यावर वितरण व्यवस्था सुधारेल इतकी माफक अपेक्षा केली जात होती. मात्र शहरातील वितरण व्यवस्थेत असलेल्या चुका तशाच ठेवत प्राधिकरणाने नव्या आणि जुन्या वाहिन्या एकत्रित सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाणीगळतीचे प्रमाण किंचितही कमी झालेले नाही. राज्यातील सक्षम यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरणाकडे पाहिले जाते. पाणीपुरवठ्याचे काम करणारी आणि वितरणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरण काम करत असले तरी अंबरनाथमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. बदलापूरमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम करत असताना केलेल्या चुकीचा भुर्दंड आजही या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यानंतर आलेल्या अमृत योजनेच्या निधीचाही योग्य विनियोग अद्याप केलेला नाही. बदलापूरमधील यंत्रणा अपयशी ठरत असतानाच त्याची पुनरावृत्ती अंबरनाथमध्येही झाली. अंबरनाथमध्ये नगरोत्थान योजनेतील काही कामे अपुरी ठेवण्यात आली. जलवाहिन्या टाकण्याचे कामही पूर्ण झालेले नाही.
अंबरनाथमध्येही जुन्या वाहिन्या तशाच ठेवत नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. अनेक नागरिकांना दोनदोन ठिकाणी कनेक्शन घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाण्याची गळती रोखण्याऐवजी पाण्याची गळती वाढविण्याचे काम प्राधिकरणाने केले आहे. १० वर्षांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत पाणीगळतीचे प्रमाण हे १७ टक्के होते. आज ही गळती दुप्पट झाली असून ती ३२ ते ३७ टक्क्यांच्या घरात गेली आहे. शहराला आवश्यक असलेला पाणीसाठा उचलण्यात येत असतानाही शहराला पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीगळती रोखण्यात आलेले अपयशच हेच मूळ समस्येचे कारण झाले आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही पाणीगळती रोखता आलेली नाही, तसेच वितरण व्यवस्थेत सुधारणाही करता आलेली नाही. सरकारचे सर्व अनुदान हे पालिकेकडे वर्ग होणार असतानाही पालिकेने पाणीपुरवठ्याचे काम करण्यासाठी प्राधिकरणाला निधी वर्ग केला. मात्र जबाबदार संस्थाच या कामात अपयशी ठरली आहे.

ज्या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर आहे, त्या चिखलोली धरणातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. आजूबाजूच्या रासायनिक कंपन्यांमुळे धरणातील पाणी हे दूषित झाले आहे. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ज्या धरणातून १२ महिने पाणीपुरवठा होत होता. आज त्या धरणातील दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही यंत्रणाही प्राधिकरणाकडे असून ती यंत्रणा सक्षमपणे चालविण्यात अपयश आले आहे.

नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार
नागरिकांना आवश्यक असलेले पाणी देण्यात प्राधिकरण कमी पडत असेल तर त्या प्राधिकरणाला विरोध करणे गरजेचे आहे, असा सूर उमटू लागला आहे. जीवन प्राधिकरण हटाव, शहर बचाव, ही मोहीम राबविण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. प्राधिकरणाच्या चुकीचा भुर्दंड नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सहन करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा संताप सहन करण्याची वेळ आता प्राधिकरणावर आली आहे.

Web Title: Life authority lost the trust of citizens of Ambarnath-Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी