मुंब्रा खून प्रकरणात आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:55 AM2018-02-06T02:55:27+5:302018-02-06T02:55:38+5:30
मुंब्रा येथील एका रहिवाशाच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना ठाणे न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात मृताची पत्नी आणि तेरा वर्षीय मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.
ठाणे : मुंब्रा येथील एका रहिवाशाच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना ठाणे न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात मृताची पत्नी आणि तेरा वर्षीय मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.
कौसा-मुंब्रा येथील जावेद ऊर्फ जावा नूरअहमद शेख आणि मोहम्मद अस्लम ऊर्फ शेरू मोहम्मद हनीफ शेख ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. त्यांना मुंब्रा येथील आझादनगरात राहणाºया मेहमूद खानची झोपडी चरस, गांजासारख्या अमली पदार्थांच्या धंद्यासाठी हवी होती. अवैध धंद्याकरिता झोपडी वापरण्यासाठी देण्यास मेहमूद खान यांनी आरोपींना विरोध दर्शवला. त्याचा राग येऊन दोन्ही आरोपींनी चारपाच साथीदारांच्या मदतीने मेहमूद खानवर प्राणघातक हल्ला चढवला. घराच्या बाहेर खेचून चाकू आणि तलवारीने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात मेहमूद खानचा मृत्यू झाला. त्याची पत्नी समिना मेहमूद खानच्या तक्रारीवरून शीळ-डायघर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी या प्रकरणाचा तपास केला. सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. आरोपींचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण
आरोपींनी मेहमूद खानला घरातून खेचून काढून त्याचा खून केला. त्याची पत्नी समिना आणि १३ वर्षांची मुलगी याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने स्वत:चे कपडे जाळले होते. हा पुरावाही महत्त्वाचा ठरला.