अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र पित्याला जन्मठेप
By जितेंद्र कालेकर | Published: November 7, 2023 09:23 PM2023-11-07T21:23:27+5:302023-11-07T21:23:29+5:30
ठाणे जिल्हा न्यायालयाचा निकाल : मेणबत्तीचे चटके देण्याची धमकी देत अत्याचार
ठाणे : आपल्याच सहा वर्षांच्या अंध सावत्र मुलीवर सहा महिन्यांपासून वारंवार बलात्कार करणाऱ्या ४४ वर्षीय सावत्र पित्याला ठाणे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रचना तेहरा यांनी जन्मठेपेची व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे.
ठाण्यातील मुंब्रा भागात आरोपी हा त्याच्या पत्नीच्या सहा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलासह वास्तव्य करीत होता. त्याची पत्नी कामावर गेल्यानंतर तो या मुलाला धमकावून घराबाहेर काढत होता. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता. या अंध मुलीच्या अंगाला मेणबत्तीने चटके देत मारण्याची धमकी देत होता. हा प्रकार ४ डिसेंबर २०२० च्या आधीपासून सहा महिने सुरू होता. हा संतापजनक प्रकार मुलीच्या आईला समजताच तिने मुंब्रा पोलिस ठाण्यात बलात्कार, मारहाण तसेच पोक्सोअंतर्गत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलिसांनी त्याला अटक केली होती. ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रचना तेहरा यांच्याकडे खटल्याची सुनावणी झाली. तपास अधिकारी म्हणून दीपक घुगे यांनी तर सरकारी अभियोक्ता म्हणून संध्या म्हात्रे यांनी काम पाहिले. यावेळी पाच साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षी पुरावे पडताळल्यानंतर आरोपीला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.