कामधंद्यावरुन बोलल्याने आत्याचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Published: September 4, 2023 09:53 PM2023-09-04T21:53:22+5:302023-09-04T21:54:00+5:30
ठाणे न्यायालयाचा निकाल: भिवंडीतील घटना
ठाणे: कामधंद्यावरुन बोलणाऱ्या कमरुनिसा खान (४५) या आपल्या आत्याचा सुऱ्याने वार करुन खून करणाऱ्या इम्तीयाज शेख (२६, रा. भिवंडी) याला ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.
भिवंडीतील वेताळपाडा भागात हा प्रकार घडला होता. १४ फेब्रुवारी २०१६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास इम्तीयाज याने त्याच्या आत्याच्या डोक्यात सुऱ्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. जखमी अवस्थेत तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी इम्तीयाज याला अटक केली होती. कमरुनिसा ही त्याला कामधंद्यावरुन तसेच खाण्यावरुन नेहमी बोलायची. याच रागातून हा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. या खटल्याची सुनावणी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रेमल विठ्ठलानी यांच्या न्यायालयात ४ सप्टेंबर २०२३ रोजी झाली. यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सर्व साक्षी पुरावे सादर केले. सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला दोषी मानून इम्तीयाज याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.