पूर्ववैमनस्यातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:08+5:302021-06-18T04:28:08+5:30
ठाणे : मारहाण केल्याच्या रागातून अनिल थापा (२८, रा. नवी मुंबई, मूळ रा. नेपाळ) याच्या डोक्यात दगडाने प्रहार करून ...
ठाणे : मारहाण केल्याच्या रागातून अनिल थापा (२८, रा. नवी मुंबई, मूळ रा. नेपाळ) याच्या डोक्यात दगडाने प्रहार करून त्याचा खून करणाऱ्या सोलापूरच्या गणेश गायकवाड (२३) याला गुरुवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
आरोपी गणेश हा मूळ सोलापूरचा असून आई-वडिलांच्या निधनानंतर तो तिथून नवी मुंबईत पळून आला होता. नवी मुंबईत तो कचरा वेचण्याचे काम करीत होता. मूळ नेपाळचा रहिवासी असलेला अनिल बेकार होता. दरम्यान, या घटनेच्या काही दिवसांपूर्वी गणेशने अनिल याला नाष्ट्यासाठी समोसे देऊ केले. त्यावेळी त्याने रागाच्या भरात मी भिकारी आहे का, असे म्हणून गणेशला मारहाण केली होती. त्याचीच सल गणेशच्या मनात होती. त्याचा काटा काढण्याचा विचार करीत असतानाच दीड वर्षांनी अनिल हा नवी मुंबई सेक्टर एक येथील एका उद्यानामध्ये २७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारच्या सुमारास एकटाच झोपल्याचे गणेशच्या निदर्शनास आले. अनिल झोपेत असतानाच गणेशने त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करीत त्याला गंभीर जखमी केले. नंतर तिथून तो पसार झाला होता. दरम्यान, अनिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर यातील कथित आरोपी गणेशला वाशी पोलिसांनी त्याच रात्री अटक केली. या खटल्याची ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. कनिष्ठ न्यायालयात आरोपीने दिलेला हल्ल्याचा कबुली जबाब, तसेच घटना घडण्यापूर्वी त्या उद्यानातील माळ्याने त्यांना एकत्र पाहिले होते, असे सबळ परिस्थितीजन्य पुरावे सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी न्यायालयात सादर करून आरोपीला शिक्षा देण्यासाठी युक्तिवाद केला. त्या आधारावर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी केला आहे.