पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:06 AM2018-03-28T00:06:30+5:302018-03-28T00:06:30+5:30
पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीस ठाणे न्यायालयाने शुक्रवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीच्या दोन्ही मुलांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला.
ठाणे : पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीस ठाणे न्यायालयाने शुक्रवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीच्या दोन्ही मुलांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला.
सदाफळ यादव (३३) हे या खटल्यातील आरोपीचे नाव आहे. ठाण्यातील वर्तकनगरात २३ जून २0१४ रोजी ही घटना घडली होती. आरोपीचे त्याची पत्नी उषासोबत नेहमी वाद व्हायचे. आरोपी वर्तकनगरात एक दुकान चालवायचा. जवळपास १५ वर्षांपूर्वी लग्न झालेल्या आरोपीला चार आणि सात वर्षे वयाची दोन मुले होती. त्याच्या भावाला लग्नामध्ये चांगला हुंडा मिळाला होता. त्यावरून आरोपी आणि सासरची मंडळी उषाचा शारिरीक आणि मानसिक छळ करायचे. काही वर्षांपूर्वी उषाने याप्रकरणी एका अशासकीय संस्थेकडे तक्रारी केली होती. मात्र, पतीसह सासरच्या मंडळीनी वर्तणुकीत सुधारणा करण्याची हमी दिल्याने तिने तक्रार मागे घेतली. प्रत्यक्षात त्यानंतरही उषाचा छळ सुरूच होता. पती तिला मारहाण करायचा, जेवायला द्यायचा नाही, एवढेच काय माहेरी संपर्कही साधू द्यायचा नाही. सासरची मंडळी यासाठी आगीत तेल टाकायचे काम करायचे. २३ जून २0१४ रोजी आरोपीने तिला जबर मारहाण करून आणि बेडशीटने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर फॅनला गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपीने केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा दोन्ही मुलांनी वस्तुस्थिती सांगितली. अटकेच्या भितीने आरोपी उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील मूळ गावी पळून गेला. पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्याविरूद्ध आरोपपत्र सादर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.एस. बंगाळे यांनी या प्रकरणाचा तपास केला.
सत्र न्यायाधिश एस.सी. खलिपे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील वंदना जाधव यांनी सरकार पक्षाची बाजू न्यायालयात मांडली.