ब्रेनडेड झालेल्या तरुणाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; तर दोघांना नेत्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 08:56 PM2017-10-23T20:56:26+5:302017-10-23T20:56:57+5:30
मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील बिलिंग विभागात काम करीत असलेल्या रूपा उचील यांचा २० वर्षीय मुलगा प्रतीक याचा शुक्रवारी दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी काशिमीरा येथे अपघात झाला.
- राजू काळे
भाईंदर, दि. २३ - मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील बिलिंग विभागात काम करीत असलेल्या रूपा उचील यांचा २० वर्षीय मुलगा प्रतीक याचा शुक्रवारी दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी काशिमीरा येथे अपघात झाला. त्यात त्याला जबर मर लागल्याने तो कोमात गेला. त्याच्यावर वोक्हार्ट अत्याधुनिक उपचार करूनही त्याची प्रकृती सुधारली नाही. अखेर त्याच्या पालकांनी त्यांचे दुःख पचवून आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या पाचजणांना ऐन दिवाळीत जीवनदान मिळाले.
मीरारोड येथील भारती पार्क परिसरात राहणारा प्रतीक शुक्रवारी काशिमीरा पुलावरून मुंबईकडे आपल्या मित्रासोबत मोटार सायकलवरून जात होता. त्यावेळी प्रतीक मोटरसायकल चालविणाऱ्याच्या मागे होता. मोटरसायकल वेगात असताना त्यावरील नियंत्रण सुटून ती एका खांबाला जोरात आदळली व मागे बसलेला प्रतीक रस्त्यावर फेकला गेला. यावेळी त्याने हेल्मेट घातले नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्याच्यावर लगतच्या ऑर्बिट रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवार ते शनिवारी संपूर्ण दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु, त्याने त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. ऐन दिवाळीत आपल्या कुटुंबावर झालेल्या या आघातामुळे प्रामुख्याने त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. तो आघात पचवून त्याच्या पालकांनी आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. तास निर्णय त्यांनी डॉक्टरांना कळविल्यानंतर अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना प्रतीकचे यकृत, २ किडन्या व कॉर्णीया (डोळे ) काढून त्यातील यकृत व एका किडनीचे प्रत्यारोपण याच रुग्णालयात करण्यात आले. तर दुसरी किडनी रुग्णालयाने मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात पाठविण्यात आली, तसेच बोरीवली येथील रोटरी क्लबतर्फे प्रतिकच्या कोर्णीयाचे इतरत्र प्रत्यारोपण करण्यात आले. हे सर्व रुग्ण यकृत व किडनीच्या दुर्धर रोगांशी लढत होते. त्यांना ऐन दिवाळीत अवयव मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. तर भर दिवाळीत आपल्या घरी अंधार झाला असला तरीही दुसऱ्यांच्या घरात पणती पेटविण्याचे प्रतीकच्या पालकांनी केले असून अवयवदानांच्या चळवळीला एक नवीन भरारी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवानी म्हणाले कि, मेंदूचे कार्य थांबल्याचे (ब्रेनडेड) डॉक्टरांनी सांगताच त्याच्या आई आपला धीर एकवटून आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तिघांना जगण्याचे बळ व दोघांना दृष्टी मिळाली आहे. याबाबत समाजात मोठ्याप्रमाणात जनजागृती होणे अत्यावश्यक आहे.