रहिवाशांचा जीव सतत टांगणीला

By Admin | Published: August 21, 2015 11:32 PM2015-08-21T23:32:59+5:302015-08-21T23:32:59+5:30

मातृकृपा इमारत पडून झालेल्या दुर्घटनेमुळे ठाकुर्ली-चोळेगावातील ‘त्या’ धोकादायक-अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. केवळ पुनर्वसनाची

The life of the residents continued to hang | रहिवाशांचा जीव सतत टांगणीला

रहिवाशांचा जीव सतत टांगणीला

googlenewsNext

अनिकेत घमंडी, डोंबिवली
मातृकृपा इमारत पडून झालेल्या दुर्घटनेमुळे ठाकुर्ली-चोळेगावातील ‘त्या’ धोकादायक-अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. केवळ पुनर्वसनाची हमी मिळत नसल्याकारणाने या ठिकाणी अजूनही शेकडो रहिवासी जीव मुठीत धरून राहतात. घरात २४ तास पाणी, अभावानेच खंडित होणारा विद्युतपुरवठा हे असले तरी जीवाचीच शाश्वती नसल्याने येथील नागरिक अस्वस्थ आहेत.
केडीएमसीची डोळेझाक, दुर्लक्ष, मालकांची दडपशाही आदींमुळे ही स्थिती आहे. त्या दुर्घटनेला महिना होत आला, मात्र अद्यापही धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर प्रशासनाने, ना राज्य शासनाने तोडगा काढला. जोपर्यंत मालक पुनर्वसनाची हमी देत नाही, तोपर्यंत जागा सोडणार नाही, असा पवित्रा येथील नागरिक घेत आहेत. चोळेगाव या महापालिकेच्या ६३ क्रमांकाच्या वॉर्डाचे हे भयाण वास्तव आहे. अवघ्या फर्लांगावर असलेल्या खंबाळपाडा वॉर्डात झपाट्याने शहरीकरण होत असताना चोळेगावात मात्र दाटीवाटीची स्थिती आहे. एकमेकांना लागून इमारती बांधल्याने अनेक घरांमध्ये सूर्यप्रकाश, खेळत्या हवेचा अभाव आहे. मालक-भाडेकरू यांच्यातील संघर्ष दिसून येतो. महापालिकेने यामध्ये लक्ष घालत तोडगा काढावा, धोरण जाहीर करावे, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असले तरी ते तोकडे पडत आहेत.
गावठाण असल्याने रस्तेही अरुंद, चिंचोळे. एका वेळी एक बैलगाडीच जाऊ शकेल, अशी भयंकर स्थिती. त्यातच बहुतांशींकडे दुचाकी, चारचाकी असल्याने त्या रस्त्यावर उतरल्यास वाहतूककोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय असूनही सायलेन्स झोनचा पत्ताही नाही. कर्णकर्कश हॉर्न, कोंडी यासह प्रदूषण या सर्वांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. स्वच्छता असली तरीही चाळ संस्कृती असल्याने येता-जाता कचरा टाकला जातो. परिणामी, महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्यांनी फेऱ्या मारूनही स्थिती ‘जैसे थे’च. रस्त्याच्या दुतर्फा गाड्या अस्ताव्यस्त लावत असल्यानेही कोेंडीत भर पडते. दुचाकींसह चारचाकींसाठी पार्किंग स्टॅण्ड, ट्रक, टेम्पो टर्मिनस आणि रिक्षा स्टॅण्डचा अभाव असल्याने वाहने कशीही, कुठेही पार्क होतात. हाकेच्या अंतरावर रेल्वे स्थानक असले तरीही तेथे जाताना नागरिकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. येथील बहुतांशी जागा रेल्वे हद्दीत येत असल्याने अनेकदा एनओसी मिळवताना नाकीनऊ येते.

Web Title: The life of the residents continued to hang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.