महापौरांच्या प्रभागातील नागरिकांची जीवघेणी कसरत; मीरा रोड-भाईंदर महापालिकेचं दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 09:07 PM2021-06-13T21:07:15+5:302021-06-13T21:15:00+5:30
महापालिकेने येथील नाल्यावर लोखंडी जाळीचा ये जा करण्यासाठी मार्ग बनवला होता. परंतु पावसाआधी कॉंक्रिटचा मोठा नाला बांधण्याचे काम पालिकेने सुरू केले होते
मीरारोड - महापौर जोशना हसनाळे यांच्या प्रभागातील मीनाक्षी नगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ये जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने त्यांना नाल्यावरील चिंचोळ्या स्लॅब वरून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. काशिमिरा भागातील माशाचा पाडा मार्गावर मीनाक्षी नगर ही पक्क्या चाळींची वस्ती आहे. सदर वस्तीतील नागरिकांना ये जा करण्यासाठी स्थानिक खासगी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीतून रस्ता दिला आहे. परंतु गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने हा रस्ता खराब होऊन तेथे चिखल व पाणी साचले आहे.
महापालिकेने येथील नाल्यावर लोखंडी जाळीचा ये जा करण्यासाठी मार्ग बनवला होता. परंतु पावसाआधी कॉंक्रिटचा मोठा नाला बांधण्याचे काम पालिकेने सुरू केले होते जेणेकरून लोखंडी जाळीचा ये जा करण्यासाठी बनवलेला पूल काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांपासून महिला, पुरुष व वृद्धांना नाल्यावर बांधलेल्या चिंचोळ्या काँक्रिटच्या स्लॅब वरून ये-जा करावी लागत आहे. नवीन नाला हा खोल व मोठा असल्याने चिंचोळ्या स्लॅब वरून ये जा करणे धोक्याचे ठरले आहे. रहिवासी जीव मुठीत ठेवून कशीबशी ये जा करतात.
सदर नाल्यामधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणाऱ्या पाण्याचा लोंढा वाहात असतो. मुसळधार पाऊस असला की नाला पाण्याने तुडुंब भरून आजुबाजुचा परिसर सुद्धा जलमय होतो. परिसरात कमरे एवढे पाणी साचते. अशा परिस्थितीत नाल्यावरून ये जा करणे अशक्य होते. ह्या प्रभागात महापौरांसह अन्य तीन भाजपा नगरसेवक असून देखील कोणीही आमच्या समस्या सोडवण्यासाठी येत नसल्याने अनेक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील महापौरांसह अन्य तीन नगरसेवकांवर आमचा विश्वास नसून त्यांच्याकडून रस्त्याची समस्या सोडविण्याची अपेक्षा राहिलेली नाही असे सांगितले. आम्ही महापालिका आयुक्तांना विनंती केली असून नाल्यावर ये जा करण्यासाठी लहानसा पूल तसेच कायमस्वरूपी पर्यायी रस्ता बांधून द्यावा. जेणेकरून नाल्यात पडून एखाद्या रहिवाशांचा मृत्यू वा अपघाता सारखी दुर्दैवी घटना टाळता येईल असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महापौर काय म्हणाल्या?
विरोधक हे राजकीय द्वेषाने कामात खो घालतात. पुलाचे काम ज्यांच्यामुळे रखडले तेच पूल नाही म्हणून कांगावा करतात. रहिवाशांना असलेल्या पर्यायी रस्त्याच्या डागडुजीसाठी पालिकेला निर्देश दिले आहेत. तसेच नाल्यावर पादचाऱ्यांना ये जा करण्यासाठी पावसामुळे थांबलेले काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे असं महापौर ज्योत्स्ना हसनाळे म्हणाल्या आहेत.