लोकगायक किसन फुलोरे यांना जीवन गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:36+5:302021-03-14T04:35:36+5:30
ठाणे : सुमारे पन्नास वर्षांपासून आपल्या लोकसंस्कृतीच्या जतनाचे कार्य अखंड करणारे लोकगायक किसन फुलोरे यांना महाशिवरात्रीचे औचित्य साधून ...
ठाणे : सुमारे पन्नास वर्षांपासून आपल्या लोकसंस्कृतीच्या जतनाचे कार्य अखंड करणारे लोकगायक किसन फुलोरे यांना महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्रीघोलाईदेवी देवस्थान आणि स्व. श्री.राजाराम पाटील एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरुवारी श्री घोलाई देवस्थान-पारसिक, खारीगाव येथे हा सोहळा साध्या स्वरूपात परंतु पारंपरिक पद्धतीने झाला.
गायक किसन फुलोरे यांनी आता वयाची पासष्ठी गाठली आहे. खारीगावातील स्त्री-पुरुषांची पारंपरिक गाणी ऐकून बालवयापासूनच त्यांना लोकसंगीताची आवड निर्माण झाली. मूळ पारंपरिक शैलीचे गायन ही त्यांची खासियत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीच्या काळात त्यांनी बुलबुल तरंग, घुंगरू आणि ढोलकीच्या तालात लोकगीते सादर केली. ही गीते महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाली. त्यांनी फेऱ्यांची गाणी, धवला, गौरी गणपतीची गाणी, हावलायची गाणी, लग्नगीते, भक्तिगीते अशी विविध प्रकारची लोकगीते पारंपारिक नृत्यासह सादर केली. त्यातील गाणी व नृत्य पाहून नव्या पिढीने ते आत्मसात केले. आजही गावोगावी गौरी गणपतीला या गाण्यांवर स्त्रीया फेर धरून नाचतात. 'नवसाला पावली हाकेला धावली एकवीरा माऊली' या सारखी अनेक श्री एकवीरा देवीची भक्तिगीतही प्रसिद्ध आहेत. त्यांचा मराठी वाद्यवृंद 'चांदणे स्वरांचे' हा लोकप्रिय झाला. 'गाऊ महाराष्ट्राची गाणी' लोकप्रिय होता, महाराष्ट्राचे पारंपारिक लोकरंग, भक्तीत रंगले सूर, तसेच 'हळदी'ची गाणी गाजली.
आज फुलोरे यांची प्रेरणा घेऊन त्यांचे चिरंजीव अमित व नातू संगीत या क्षेत्रात नाव लौकिक करीत आहेत.
--------------------------------------
फोटो मेलवर