अधिकाऱ्यांनाच खड्ड्यात लोळवू; खड्ड्यांवरुन मनसेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:55 AM2018-07-23T02:55:21+5:302018-07-23T02:55:51+5:30
लाज वाटण्यासाठी दिली लाजाळूच्या झाडाची भेट
कल्याण : शहरात पडलेल्या खड्ड्यांची लाज वाटावी, याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग अधिकाºयांना शनिवारी पूर्व भागातील लाजाळूचे झाड भेट देण्यात आले. जर खड्डे वेळीच बुजवले नाहीत तर पुढच्या वेळेस अधिकाºयांना खड्ड्यात लोळवू, असा इशाराही मनसैनिकांनी यावेळी दिला.
खड्ड्यांमुळे चौघांचे मृत्यू झाल्याप्रकरणी, पश्चिमेकडील भागात मनसेच्या वतीने मुख्यालयावर ‘चले जाव’ मोर्चा काढण्यात आला होता. पश्चिमेकडे ज्याप्रमाणे खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण केली आहे. त्याप्रमाणे पूर्वेकडील भागातही खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. पूर्वेकडील विजयनगर नाका, वालधुनी उड्डाणपूल, म्हसोबा चौक या मुख्य भागांसह अन्य ठिकाणच्या रस्त्यांची देखील खड्ड्यांनी दुर्दशा केली आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ येथील मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी ‘ड’ चे वसंत भोंगाडे आणि ‘जे’ चे भागाजी भांगरे अशा दोन प्रभागक्षेत्र अधिकाºयांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. यावेळी मनसे उपशहरअध्यक्ष योगेश गव्हाणे, माजी नगरसेवक अनंता गायकवाड, शाखाध्यक्ष मनीष यादव, हरीश इंगळे, योगेश लामखडे, हरीष शेलार आदी उपस्थित होते. अधिकाºयांना लाजाळूचे झाड भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कामे सुरू नाहीत याकडे लक्ष वेधताना जर खड्डे भरले जात असतील, तर भरण्यात आलेले खड्डे दोन ते तीन तासात उखडतात कसे, असा सवाल करण्यात आला. दरम्यान खड्ड्यांची लाज वाटावी, यासाठी लाजाळूचे झाड भेट देत जर खड्डे बुजविले तर सत्कार करू, अन्यथा खड्ड्यात लोळवू असा इशारा मनसैनिकांनी यावेळी दिला.
अब तक २,१९४
कल्याण - डोंबिवली महापालिकेने ३०८२ खड्ड्यांपैकी आतापर्यंत २ हजार १९४ खड्डे बुजविल्याची माहिती दिली. १४ ते २१ जुलै या कालावधीतील ही आकडेवारी असून या कामांतर्गत चेंबरची देखील दुरूस्ती केली आहे. यापुढेही खड्डे बुजविण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट केले. आतापर्यंत बुजवलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १३ हजार ८३६ चौमी. आहे.
खड्डे आणि रस्ता समपातळीत नसणे यामुळे यंदाच्या पावसात चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या निषेधार्थ सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रशासनाला धारेवर धरले गेले असताना महापालिका जोमाने कामाला लागली आहे. दरम्यान, भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे चित्र असले तरी बहुतांश ठिकाणी बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याचेही दिसते आहे.