स्वयंचलित जिना असलेल्या फलाटावरच लिफ्टचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:40 AM2021-03-19T04:40:17+5:302021-03-19T04:40:17+5:30
बदलापूर : बदलापुरात ज्या फलाटावर प्रवाशांची गर्दी अधिक असते त्याऐवजी कमी गर्दी असलेल्या फलाटावर लिफ्ट बांधण्यात येत आहेत. या ...
बदलापूर : बदलापुरात ज्या फलाटावर प्रवाशांची गर्दी अधिक असते त्याऐवजी कमी गर्दी असलेल्या फलाटावर लिफ्ट बांधण्यात येत आहेत. या चुकलेल्या नियोजनात दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
बदलापूर रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक तीनवर तिकीटघराच्या बाहेर लिफ्ट बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र ज्या फलाट क्रमांक तीनवर ही लिफ्ट बसविण्यात येत आहे. त्याच फलाटावर स्वयंचलित जिनाही आहे. दुसरी बाब म्हणजे फलाट क्रमांक तीनवर कर्जतकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याच थांबतात. फलाट क्रमांक तीनजवळ रस्ता आहे. येथून बाहेर पडण्यासाठी असलेल्या तीन मार्गांवरून थेट रस्त्यावर येता येत असल्याने पश्चिम भागात जाणारे प्रवासीच या स्वयंचलित जिन्याचा वापर करतात. याउलट फलाट क्रमांक एक व दोन संलग्न असून या ठिकाणी बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून बदलापूरकडे व कर्जत-खोपोलीकडे येणाऱ्या लोकल थांबतात. त्यामुळे स्वाभाविकच फलाट क्रमांक तीनच्या तुलनेत फलाट क्रमांक एक व दोनवर प्रवाशांची गर्दी अधिक असते. त्यामुळे ही लिफ्ट फलाटांवर असणे अपेक्षित होते. मात्र रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक तीनवर लिफ्ट बसविण्याचे काम सुरू केले आहे, याबद्दल प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. बदलापूर शहरातून दररोज हजारो प्रवासी मुंबईला कामासाठी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक व दोनवरही लिफ्टसारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
---------------------------
कोट
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता फलाट क्रमांक एक व दोनवर स्वयंचलित जिने बसविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत. मात्र त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. होम प्लॅटफॉर्मचे कामही संथगतीने सुरू आहे. ही लिफ्ट फलाट क्रमांक एक व दोनवर बसविली असती तर प्रवाशांसाठी अधिक सोयीचे झाले असते.
- रमेश महाजन, संस्थापक अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था, बदलापूर