दृष्टिहिनांच्या कलागुणांचा प्रकाश चमकला!
By admin | Published: March 22, 2016 02:08 AM2016-03-22T02:08:00+5:302016-03-22T02:08:00+5:30
वक्तृत्व, गायन, स्वरचित काव्यवाचन, ब्रेलवाचन, वादविवाद आणि प्रश्नमंजूषा अशा स्पर्धांत दृष्टिहिनांनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या प्रकाशाने उजेडाची वाट दाखवली.
ठाणे : वक्तृत्व, गायन, स्वरचित काव्यवाचन, ब्रेलवाचन, वादविवाद आणि प्रश्नमंजूषा अशा स्पर्धांत दृष्टिहिनांनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या प्रकाशाने उजेडाची वाट दाखवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या दृष्टिहिनांनी ज्वलंत विषयावर आपले नेमकेच विचार मांडून श्रोत्यांसह परीक्षकांनाही मंत्रमुग्ध केले. नांदेडहून आलेल्या प्रदीप नरावडे या मुलाने आपल्या सुरेल आवाजातील गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. त्याचा या सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला.
नेत्रदीप संस्थेच्या वतीने अंध विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. हितवर्धिनी सभागृहात दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. महाराष्ट्रभरातून १८० हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. ‘दहशतवाद जगाला लागलेली एक कीड’, ‘भारतीय राजकारणाची दशा आणि दिशा’, ‘पर्जन्यसंवर्धन ही काळाची गरज’, ‘आरक्षणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे का?’, ‘सावित्रीबाई फुले आणि आधुनिक स्त्रिया’ या विषयांवर स्पर्धकांनी वक्तृत्व स्पर्धेतून आपले परखड मत मांडले.
ब्रेलवाचन ही स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून घेण्यात आली. या स्पर्धेत ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. वादविवाद स्पर्धेचे विषय स्पर्धेच्या वेळी जाहीर करण्यात आले होते. या वेळी स्पर्धकांचा तीन जणांचा गट करून देण्यात आला.
‘भारतातील सध्याचे वातावरण सहिष्णू की असहिष्णू’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअप अशा सोशल मीडियाचा उपयोग ही आजच्या तरु णाईची गरज की चैन’, ‘महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची वेळ आली आहे का?’, ‘बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना आपला स्वाभिमान गमावत चालली आहे का?’ या विषयांवर दृष्टिहिनांची वादविवाद स्पर्धा रंगली होती.
स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत ४० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धा शनिवारी पार पडल्या, तर रविवारी प्रश्नमंजूषा स्पर्धा व गायन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)