आदिवासी पाड्यांत पडणार उजेड; सोलर दिवे लावले जाणार

By अजित मांडके | Published: March 6, 2024 02:22 PM2024-03-06T14:22:41+5:302024-03-06T14:22:54+5:30

पथदिवे नसल्याने सायंकाळी ६ वाजल्यानंतर लहान मुले व जेष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत.

Light will fall in tribal villages; Solar lights will be installed | आदिवासी पाड्यांत पडणार उजेड; सोलर दिवे लावले जाणार

आदिवासी पाड्यांत पडणार उजेड; सोलर दिवे लावले जाणार

ठाणे :  घोडबंदर भागात असलेल्या जवळपास २७ छोटे-मोठे आदिवासी पाड्यात आता रस्त्यांवर पथदिवे लावले जाणार आहेत. यासाठी पाच कोटींचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे आता आदीवासी पाड्यातून जाणाºया नागरिकांना आता रस्त्यावरुन जातांना सोलार दिव्यांचा उजेड मिळणार आहे.  

आदिवासी पाड्यात घरे दूरदूरवर असतात तसेच सर्व आदिवासी पाड्यावर विजेच्या जोडण्या दिलेल्या नाहीत. जरी घरात वीज आली असली तरी पाड्यांकडे जाणारे रस्ते, आदीवासी पाडे येथे पथदिवे नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असलेले तसेच वन खात्याच्या हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर दिवे लावण्यासाठी वन विभागाची परवानगी मिळत नाही. अनेक ठिकाणी महावितरणचे विजेचे खांब, वीज तारा टाकण्यासाठी अडचणी येतात. तसेच वन विभागाचा ना हरकत दाखला, परवानगी मिळत नसल्याने आजवर अनेक ठिकाणी पथदिवे लागलेले नाहीत. तसेच रात्रीच्या वेळेस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राणी शिकार करण्यासाठी बाहेर पडून जवळच असलेल्या आदिवासी पाड्यांतील रस्त्यांवर येतात त्यामुळे रस्त्यांवर पथदिवे नसल्याने तेथील आदिवासी नागरिकांवर हिंस्त्र पशुंचे हल्ले होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस घरी जाताना वाट काढणे कठीण होते.  

त्याचप्रमाणे पथदिवे नसल्याने सायंकाळी ६ वाजल्यानंतर लहान मुले व जेष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे या पाड्यांवर पथदिवे लावण्यासाठी सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार यासाठी ५ कोटींचा निधी मंजुर झाला असून आता लवकरच या भागात सोलार दिवे लावले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  या कामाची आता निविदा प्रक्रिया झाल्यामुळे हे सोलर दिवे लावण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. सौर पथदिवे या प्रणालीमध्ये वापरली जाणारी बॅटरी साधारण १० ते ११ तास पुरेल इतकी उर्जा साठवून ठेवण्यास सक्षम असते. शिवाय यामध्ये दिवे चालू व बंद करण्यासाठी एक स्वयंचलित बटन देखील असते जे सायंकाळ ते पहाट या कालावधीत दिवे वापरण्यासाठी बनविलेले असते तसेच बॅटरीला अतिरिक्त चार्ज होण्यापासून तसेच ती अतिरिक्त ड्रेन होण्यापासून म्हणजे तिची ताकद पूर्णपणे संपण्यापासून रोखते, असेही सांगण्यात आले.

Web Title: Light will fall in tribal villages; Solar lights will be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.