उत्तन समुद्रातील आणखी ३ खडकांवर होणार दीपस्तंभ ; मच्छीमारांना बोटीने ये - जा करण्यात मिळणार सुरक्षित वाट
By धीरज परब | Published: February 3, 2024 09:36 PM2024-02-03T21:36:34+5:302024-02-03T21:36:42+5:30
दीपस्तंभ मुळे मच्छीमारांना काळोखात खडकांवर बोटी आदळून होणाऱ्या अपघातां पासून सुटका मिळणार आहे .
मीरारोड - भाईंदर उत्तन जवळील खोल समुद्रात सऱ्याची वाट, कातल्याची वाट, वाशी खडक येथील खडकांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण ३ दीपस्तंभ उभारले जाणार असून त्याचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी समुद्रातील खडकांवर खासदार राजन विचारे यांनी केले . दीपस्तंभ मुळे मच्छीमारांना काळोखात खडकांवर बोटी आदळून होणाऱ्या अपघातां पासून सुटका मिळणार आहे .
भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावरील उत्तन , पाली , चौक येथील मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाताना व मासेमारी करून परत येताना समुद्रातील खडक हे रात्रीच्या वेळी अडचणीचे ठरतात . किनाऱ्या कडे येताना खडक न दिसल्याने बोट खडकावर आदळून बोटींचे अपघात व नुकसान होत असे .
मच्छीमारांच्या मागणी नंतर ह्या आधी खासदार राजन विचारे यांनी खुट्याची वाट येथे सन २०१८-१९ च्या जिल्हा नियोजन विभागाकडून ७२ लाखाचा निधी मंजूर करून दीपस्तंभाचे काम पूर्ण करून घेतले होते . त्यानंतर मच्छीमारांच्या मागणीनुसार सऱ्याची वाट, कातल्याची वाट, वाशी खडक येथील तीन खडकांवर सुद्धा दीपस्तंभ उभारण्यासाठी खा. विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा चालवला होता . त्यासाठी सन २०२१-२२ च्या जिल्हा नियोजन मधून ३ कोटी ५२ लाख निधीची मंजुरी मिळाली होती .
परंतु पर्यावरणाच्या मंजुऱ्या न मिळाल्याने सदर कामे सुरु करता येत नव्हती. यासाठी दिल्ली येथे पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय विभागाचे कोस्टल झोन रेग्युलेशन संचालक यांच्याकडे खा. विचारे यांनी पाठपुरावा करून सदर परवानगी मिळवली. सर्व परवानग्या मिळाल्या नंतर ह्या तिन्ही दीपस्तंभाच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले होते . शनिवारी सायंकाळी या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांनी समुद्रात बोटीने जावून मच्छीमारांसह केला .
यावेळी मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, माल्कम कासुघर सह शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील, महिला शहर संघटक तेजस्वि पाटील, उपशहर प्रमुख अशोक मोरे, विनायक नलावडे, सम्राट राऊत आदी उपस्थित होते .
उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी जिल्हा नियोजन मधून डोंगरी चौक येथील लाईट हाउस साठी ९ लाख व डोंगरी चौक जेट्टीसाठी ५ कोटी मंजूर झालेले आहेत. लवकरच हि कामे सुरु होतील. वेलंकनी येथे १० रॅम्पची दुरुस्ती व रस्ते विकसित करण्यासाठी ३ कोटी ३५ लाखाचा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे असे खा . राजन विचारे यांनी यावेळी मच्छीमारांशी बोलताना सांगितले .