विद्युत वाहिन्यांखालील उद्यानांच्या वापरावर मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:13 AM2018-08-21T04:13:45+5:302018-08-21T04:15:30+5:30
सुरक्षेसाठी निर्णय; महापारेषणच्या सूचनांची होणार अंमलबजावणी
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : ऐरोली येथील दुर्घटनेनंतर अखेर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्यानात नागरिकांच्या वावरण्यावर मर्यादा येणार आहे. महापारेषणच्या सूचनांची दखल घेत सोमवारी पालिका अधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक झाली. यावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुमारे ३० उद्यानांत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापारेषणच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील मोकळ्या जागेत होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी पालिकेने त्याठिकाणची जागा विकसित केली आहे. त्यानुसार सद्यस्थितीला शहरातली सुमारे ३० उद्याने अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली आहेत. त्यापैकी ऐरोली येथील काम सुरू असलेल्या उद्यानात २ आॅगस्टला दुर्घटना घडली. विद्युत वायरच्या इन्सुलेटरचा स्फोट होवून त्याचा एक तुकडा उद्यानातून चाललेल्या मृणाल महाडिक (५२) यांच्या डोक्यात पडला. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर गेली १८ दिवसांपासून मुलुंडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महापारेषणसह पालिका अधिकाºयांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्याने, नर्सरी व इतर बांधकामांमुळे त्याठिकाणी वावरणाºया नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली कसलेही काम करू नये अशा सूचना महापारेषणच्या अधिकाºयांनी पालिका व सिडकोला यापूर्वीच केलेल्या आहेत. त्यानंतरही पालिकेने त्याठिकाणची अतिक्रमणे टाळण्यासाठी उद्याने विकसित केली आहेत. यावेळी पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून झालेल्या निष्काळजीमुळे अशा उद्यानांमध्ये नागरिकांच्या जिवावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
उद्यान विकसित करताना टाकलेल्या भरावामुळे उच्च दाबाच्या वायरीचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाले आहेत. अशातच ऐरोलीतील चिंचोली उद्यानात वायरीखालीच पाण्याचा कारंजा बसवण्यात आलेला. सर्व काम झाल्यानंतर घडलेली चूक अधिकाºयांच्या निदर्शनास आल्याने तो बंद करण्यात आला. तर बहुतांश उद्यानांमध्ये वायरीखालीच जॉगिंग ट्रॅक बनवले गेल्याने त्यावर चालतानाही नागरिकांना शॉक लागत आहेत. पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे असे प्रकार सर्वाधिक घडत आहेत. त्यामुळे ऐरोलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर महापारेषण विभागाने पुन्हा एकदा महापालिका व सिडकोला अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्याने नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्याचे कळवले आहे. त्यावर पालिका आयुक्तांनी सोमवारी उद्यान व अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. यावेळी अतिउच्च दाबाच्या विद्युत वायरींखालील ३० उद्याने बंद केल्यास त्यावर झालेला खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उद्याने नागरिकांसाठी बंद करण्याऐवजी तिथे फेरबदल करून नागरी वापरावर मर्यादा घालण्याचा निर्णय झाला आहे. याकरिता वायरीच्या आसपासच्या खेळण्यांची जागा बदलली जाणार आहे. शिवाय सूचना फलकाद्वारे नागरिकांनाही खबरदारीच्या सूचना दिल्या जाणार आहेत. मात्र विद्युत वायरीखाली पूर्णपणे नागरिकांचा वावर टाळण्याच्या महापारेषणच्या सूचना आहेत. त्यानंतरही उद्यानावरील खर्च वाया जावू नये यासाठी नागरिकांवरच सुरक्षेची जबाबदारी ढकलली जात आहे.
महापारेषणच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वायरींखालील जागा रिक्त ठेवणे गरजेचे आहे. यानंतरही पालिकेने अनेक ठिकाणी उद्याने विकसित केली आहेत. ऐरोलीतील दुर्घटनेनंतर अशा सर्वच उद्यानात वावरणाºया नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुसार अशी उद्याने नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्याच्या सूचना पालिकेला केल्या आहेत.
- महेश भागवत, अधीक्षक अभियंता, महापारेषण
ऐरोलीतील दुर्घटनेनंतर अतिउच्च दाबाच्या विद्युत वायरींखाली पालिकेने विकसित केलेल्या उद्यानांमध्ये फेरबदल केले जाणार आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी आवश्यक सूचना केल्या आहेत. त्यानुसार अशा उद्यानात सूचना फलक लावून नागरिकांना सतर्क केले जाणार आहे, तर वायरींखालील जॉगिंग ट्रॅक, खेळणी सुरक्षित ठिकाणी हलवली जाणार आहेत. - नितीन काळे, उपआयुक्त, उद्यान विभाग.