टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत लाईन बॉईजला विजेतेपद
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 22, 2024 04:53 PM2024-04-22T16:53:49+5:302024-04-22T16:58:30+5:30
साई स्पोर्ट्स क्लबच्या विजय तावडे यांच्या सहकार्याने आयोजित शताब्दी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : टेनिस बॉल क्रिकेटमधील विजयाचे लक्ष्य पार करण्याच्या नियमानुसार लाईन बॉईज संघाने जय विश्वेवर संघाचा पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटीने शताब्दी वर्षानिमित्ताने साई स्पोर्ट्स क्लबच्या विजय तावडे यांच्या सहकार्याने आयोजित शताब्दी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना लाईन बॉईज संघाने मर्यादित ५ षटकात ५ बाद ६७ धावा केल्या. त्यानंतर प्रतिस्पर्धी जय विश्वेश्वर संघानेही ५ षटकात ५ बाद ६७ धावा केल्या.
टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार जय विश्वेश्वर संघाला विजयाचे आव्हान पार न करता आल्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या लाईन बॉईज संघाला विजयी घोषित करण्यात आले. प्रथम क्षेत्ररक्षण करताना करण चव्हाणने सात धावांच्या मोबदल्यात हॅटट्रिक साधत लाईन बॉईज संघाला अडचणीत आणले होते. पण किरण भोईरने १८ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकत ४४ धावानीशी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या धावसंख्येचा पाठलाग करताना योगेश गंभेने ११ चेंडूत नाबाद २३ धावा करत संघाला विजयाची आस दाखवली होती. स्पर्धेत एकमेव हॅटट्रिक नोंदवणाऱ्या करण चव्हाणला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले. किरण भोईरला सर्वोत्तम फलंदाजाचे आणि योगेश गंभेला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून योगेश गंभेची निवड करण्यात आली. स्पोर्टींग क्लब कमीटीचे सचिव दिलीप धुमाळ, सुशील म्हापुसकर, जेष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मुकुंद सातघरे, प्रल्हाद नाखवा, आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.