डोंबिवली, दिवा स्थानकांत तिकिटासाठी रांगा, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:49 AM2020-10-23T10:49:28+5:302020-10-23T10:49:43+5:30
डोंबिवली : महिलांना ठरावीक वेळेत का होईना लोकल प्रवासाला मुभा मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मोठ्या ...
डोंबिवली :महिलांना ठरावीक वेळेत का होईना लोकल प्रवासाला मुभा मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मोठ्या प्रमाणावर महिला प्रवासासाठी बाहेर पडल्या. मात्र, अपुऱ्या तिकीटखिडक्यांमुळे डोंबिवली, दिवा स्थानकांतील तिकीटघरांमध्ये सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले.
अनेक महिलांनी बुधवारी पहिल्या दिवशी प्रवास टाळला होता. गुरुवारी त्या घराबाहेर पडल्याने डोंबिवली पश्चिमेला तिकिटाची रांग रेल्वेस्थानकातून थेट महात्मा गांधी रस्त्यावर पोहोचली होती. दिव्यातही पश्चिमेला महिलांच्या रांगा तिकीटघरांमधून रस्त्यावर आल्या होत्या. याबाबत दिव्यात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड. आदेश भगत यांनी माहिती घेतली असता तिकीटखिडक्या पुरेशा प्रमाणात उघड्या नाहीत. स्थानकातील एटीव्हीएम सुविधा बंद असल्याने महिला ताटकळत उभ्या असल्याचे आढळले. जशी वेळ वाढली तशी गर्दीही वाढल्याने महिला त्रस्त झाल्या. जास्तीच्या खिडक्या तातडीने सुरू करण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी रेल्वेच्या वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली.
दरम्यान, दुपारी १२ नंतर विशेष तिकीटखिडक्या सुरू झाल्यानंतर गर्दी आटोक्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनेच्या मागणीची दखल घेत विशेष खिडक्या सुरू केल्याबद्दल देशमुख यांनी रेल्वेचे आभार मानले. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महिलांना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून तिकीट, पास काढावा, असेही आवाहन त्यांनी केले. जनसाधारण तिकीट योजना (जेटीबीएस) सुविधा सुरू केल्यास हा ताण कमी होईल, असेही त्यांनी रेल्वे प्रशासनाला सुचवले आहे.
...लवकरच नियोजन अपेक्षित
तिकीट तपासनीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी पहिल्या शिफ्टमधील क्लार्क हे शिफ्ट संपली की, त्यांची अन्य कामे करण्यासाठी तिकीटखिडकी बंद करतात. त्यामुळे कर्मचारी आत असून तिकीटखिडक्या बंद का, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. त्यामुळे गोंधळ वाढतो. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या कोरोनामुळे सर्व खिडक्या उघडण्यात येत नाहीत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गरजेपुरत्याच उघडल्या जात होत्या. आता सर्वच महिलांना प्रवासाला मुभा दिल्याने गर्दी होत आहे. रेल्वे प्रशासन खिडक्या वाढवण्याबाबत लवकरच नियोजन करेल.