उल्हासनगर पालिका शाळेच्या हिरकणी कक्षात ओली पार्टी? सापडली दारूची बाटली अन् चकणा
By सदानंद नाईक | Updated: February 28, 2025 19:51 IST2025-02-28T19:50:59+5:302025-02-28T19:51:44+5:30
शरद पवार गटाचे नरेश गायकवाड यांनी केला भांडाफोड

उल्हासनगर पालिका शाळेच्या हिरकणी कक्षात ओली पार्टी? सापडली दारूची बाटली अन् चकणा
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका शाळा क्र-२९ व ८ च्या प्रांगणातील हिरकणी कक्षात ओली पार्टीचा भांडाफोड शरद पवार गटाचे नरेश गायकवाड यांनी शुक्रवारी दुपारी केला. कक्षात दारूच्या बॉटल व चकणा सापडला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन चौक परिसरात महापालिका शाळा क्रं-२९ व ८ असून शाळेत शेकडो मुले शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. शाळेच्या आवारात तीन हिरकणी कक्ष ठेवण्यात आले असून या सर्वच कक्षाला अवकळा आली आहे. हिरकणी कक्षाचा वापर काही सफाई कामगार करीत असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता शरद पवार गटाचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांनी शाळेचे शिक्षकांना घेऊन हिरकणी कक्षात काय चालले याची पाहणी केली. तेंव्हा त्यांना कक्षात दारूच्या भरलेल्या तीन बॉटल, चकणा सापडला. बॉटल व चकणा बघून येथे ओली पार्टी सुरु असल्याचे उघड झाले. शाळेच्या आवारात चक्क ओली पार्टी होते. मात्र शाळेच्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना याची कुणकुण कशी लागली नाही? असा प्रश्न निर्माण झाला.
नरेश गायकवाड यांनी याप्रकरणी सक्त कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्ताकडे केली. उपायुक्त अजय साबळे यांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची माहिती दिली. शाळा आवारात सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. कॅमेऱ्याच्या आधारे हिरकणी कक्षात कोण येते जाते. याची माहिती शाळा शिक्षकांना व शाळा प्रशासनाला माहित नाही का? की शाळा प्रशासनाची याला मूक संमती आहे. असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहे. बदलापूरच्या घटनेनंतरही काहीएक बोध घेतला नसल्याचे याप्रकाराने उघड झाले. आयुक्त मनिषा आव्हाळे याबाबत काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.